सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बहुतांशी शाळा ऑनलाईन पध्दतीनेच सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पालकांचा इंटनरेटचा वापर वाढला आहे. संसाधनांवरही खर्च वाढला असला तरीही मुलांना अपेक्षित शिक्षण मिळाले नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन शिक्षण खर्चिक असल्याचे पालकांचे मत झाले आहे.
ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी पालकांना संसाधनांवर खर्च करावा लागला. विशेष म्हणजे कोरोनामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. अशात मोबाईल, टॅब, संगणक यावरचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या असक्षम पालकांच्या पाल्याची कोंडी होत आहे. नियमित शाळा सुरू असताना पालकांना फीबरोबरच गणवेश, वह्या, पुस्तके व साहित्यावर खर्च करावा लागत होता. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरीही पालकांना आता दुहेरी खर्च करावाच लागत आहे.
मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरीही शाळांची संपूर्ण फी आणि घरात विजेसह इंटरनेटचा येणारा खर्च याचा विचार कोणत्याही पातळ्यांवर होत नाही. दुहेरी खर्चाचे ओझे पेलूनही विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत नसल्याने पालक अधिक त्रस्त झाले असून, त्यातून काही मार्ग निघावा आणि ऑफलाईन शिक्षण सुरू व्हावे, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.
चौकट :
ऑनलाईनने मुलं झाली चष्मेबद्दुर
ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप यांचा वापर सर्रास वाढला आहे. त्यामुळे दिवसभरात अभ्यासासाठी किमान तीन ते चार तासांनी मुलांचा स्क्रिनटाईम वाढला आहे. याचा थेट परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होऊ लागला आहे. शिक्षण झाल्यानंतरही मोबाईल आणि टॅब हातात असल्यामुळे मुलांना चष्मे लागले किंवा त्यांच्या डोळ्याचा नंबर वाढला आहे. मुलांचे स्क्रिनटाईमचे व्यवस्थापन न केल्यास याच्या विपरीत परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पालकांना कुठंच सवलत नाही
ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याचा भुर्दंड पालकांना सर्वाधिक बसला आहे. शाळेत न जाता शाळेची संपूर्ण फी पालकांना भरावी लागली आहे. याबरोबरच ऑनलाईनसाठी आवश्यक असणारे मोबाईल, टॅब, लॅपटॉप मुलांना स्वतंत्रपणे घेऊन देण्यात आले आहेत. इंटरनेट वापराचाही अतिरिक्त भुर्दंड पालकांच्या मानगुटीवर आहे. याबरोबरच काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी गणवेश सक्तीचा केल्याने पालकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे.
कोट :
मुलांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्याचे निमित्त म्हणजे ऑनलाईन शिक्षण. या माध्यमातून मुलांना किती आकलन होते आणि त्यांच्या ज्ञानात किती भर पडते, हा संशोधनाचा विषय आहे. मुलांच्या मानसिक विकासासाठी मोकळे वातावरण असणे अपेक्षित असते, ते वातावरण ऑनलाईनमध्ये त्यांना मिळत नसल्याने त्यांचाही कोंडमारा होत आहे.
- प्राजक्ता कोटक, ठक्कर सिटी
ऑनलाईन शिक्षण पालकांना दुहेरी भुर्दंड देणारे आहे. दोन मुलं असणाऱ्या पालकांचे तर अक्षरश: हाल आहेत. दोघांचीही शाळेची लिंक एकाचवेळी येते. त्यामुळे दोघांना स्वतंत्र मोबाईल घेतल्याने इंटरनेटचा खर्चही सध्या परवडेनासा झाला आहे. लॉकडाऊनमुळे सगळंच बंद असल्याने व्यवसाय अडचणीत आला. त्यामुळे हा दुहेरी भुर्दंड न झेपणारा आहे.
- रुपेश पिसाळ, गडकर आळी