सातारा:बँकेचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून एका तरुणाच्या खात्यातून लाखाची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील निढळ गावातील एका तरुणाला कॉलवरुन अज्ञात व्यक्तीने डेस्कटॉप अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्याच्या बॅंकेच्या खात्यातून तब्बल 1 लाख 35 हजार रुपये काढले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महेश नामदेव दळवी(वय 27, रा. निढळ, ता. खटाव) याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने पुसेगाव येथील स्टेट बॅंकेच्या खात्यामधील व्यवहारासाठी डेस्कटॉप अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर आरोपीने डेस्कटॉपचा पासवर्ड वापरुन महेश दळवी याच्या मोबाइलचा अॅक्सेस घेऊन आरोपीने त्याच्या खात्यातून 1 लाख 35 हजार रुपये लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महेश दळवी याने पुसेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे.