वाई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण बनत चालले आहे. वाई पालिका संक्रमण रोखण्यासाठी विविध उपायोजना राबवित असून, पालिकेने नुकताच गृहविलगीकरणातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संंवाद साधला. आरोग्याची कशी काळजी घ्यावी, औषधोपचार, सकस आहार याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.
ऑनलाइन कॉन्फरन्सिंगमध्ये ग्रामीण रुग्णालय वाई येथील डॉ. देसाई यांनी रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये असताना कोणती व कशी काळजी घ्यावी, औषधे कोणती घ्यावीत, आणि कोणत्या परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. याशिवाय रुग्णांच्या कोरोनासंबंधित शंकांचे निरसन करून त्यांची या रोगाबद्दलची भीती व गैरसमज दूर करण्यात आले.
यावेळी नगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी रुग्णांशी संवाद साधला. प्रामुख्याने नगरपालिका त्यांची काळजी घेत असून, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे सांगून रुग्णांचे मनोबल वाढवले. या अनोख्या उपक्रमाला रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला आणि याबद्दल समाधानही व्यक्त केले.
ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, किशोर बागुल, दीपक ओसवाल, नगरसेवक रुपाली वनारसे, सुमैय्या इनामदार, पालिकेचे कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, आरोग्य निरीक्षक खोपडे, पाणीपुरवठा अधिकारी क्रांती वाघमळे यांनी सहभाग नोंदविला.
(कोट)
दवाखान्यात बेड आहे का? औषधे, रेमडेसिविर मिळेल का, याचा विचार करायचाच नाही तर घरीच योग्य ते औषधोपचार आणि आहार घेऊन लवकर यातून बरे व्हायचे आहे. आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्याही कारणाने घराबाहेर पडायचे नाही. आपल्याला सर्व गरजेच्या गोष्टी नगरपालिकेमार्फत घरपोच दिल्या जातील. आपले सर्व सदस्य आणि कर्मचारी हे कायम आपल्या सोबत आहोत.
- विद्या पोळ, मुख्याधिकारी
फोटो : २० वाई होम आयसोलेशन