प्रमोद सुकरे -कऱ्हाड --हस्तलिखित सातबारा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी बंदी आदेश दिल्याने व संगणकीकृत सातबारा बिनचूक मिळत नसल्याने कऱ्हाड तालुक्यातील लोकांची ससेहोलपट सुरू आहे. गावोगावच्या चावडीवर ग्रामस्थ हेलपाटे मारून थकले आहेत. लोकांची कामे थटली आहेत. ‘आॅनलाईन सातबारा नावाला अन् मिळेना कुठल्याच गावाला,’ अशी स्थिती निर्माण झाली असून, या आजारावर नेमका कुठला ‘उतारा’ काढायचा हेच कोणाला समजेनासे झाले आहे. आघाडीच्या राज्य सरकारने सातबारा उतारे संगणकीकृत करण्याची मोहीम उघडली. कऱ्हाडचे तत्कालीन तहसीलदार सुधारक भोसले यांनी त्यात पुढाकार घेतला. अन् पुणे विभागात कऱ्हाडने पहिला क्रमांकही मिळविला. त्यानंतर आॅनलाईन सातबारा योजनेची घोषणाही झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१४ रोजी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना आता हस्तलिखित सातबारा उतारे देऊ नका, असे लेखी आदेश दिले. त्यामुळे आता आॅनलाईन सातबाऱ्यांमुळे लोकांची सोय होणार याचा आनंद झाला; मात्र गेल्या तीन महिन्यांत आॅनलाईन मिळणारे उतारे बिनचूक मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर बहुतांश गावात ते आॅनलाईन मिळतच नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, आॅनलाईन सातबारा योजनेत अजून बऱ्याच त्रुटी आहेत. त्या अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. त्या तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिनाभराचा अवधी घेऊन ते काम पूर्ण करायला पाहिजे. पण, तोपर्यंत लोकांच्या होणाऱ्या गैरसोयींवर उपाय म्हणून हस्तलिखित उतारे मिळायला पाहिजेत. ही फसवणूक नाही का ? सेतूमधून आॅनलाईन मिळणाऱ्या उताऱ्यांवर हे उतारे कुठल्याही शासकीय कामासाठी चालणार नाहीत, असा इंग्रजीत उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील माणसाला त्याचे ज्ञान नसल्याने तो सेतूमधून उतारा घेतोय, त्याचे पैसे मोजतोय; पण त्याचा उपयोग होत नसल्याने त्यांची ही फसवणूकच होत असल्याची चर्चा आहे. नेटसेटर बंदसंगणकीकृत सातबारा शसनातर्फे देण्यासाठी थ्री-जी नेटसेटर देण्यात आले आहेत. मात्र, ते नेटसेटर बंद केल्यामुळे उतारे देणे अवघड झाले आहे. काही सेतूमध्ये हे उतारे उपलब्ध होत असले तरी एका उताऱ्यासाठी किमान अर्ध्या तासाचा विलंब होत आहे. त्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे हे फायद्याचे की तोट्याचे हेच समजेना झालय! खरेदी-विक्री व्यवहार करायचे तरी कसे ? कऱ्हाड तालुक्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालतात. हा व्यवहार करताना तीन महिन्यांच्या आतला सातबारा उतारा लागतो; पण संगणकीकृत उतारा बिनचूक निघेना अन् तलाठी हस्तलिखित उतारा देईना, त्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित पडले आहेत.
आॅनलाईन सातबारा; मिळेना गावाला..!
By admin | Published: June 25, 2015 9:32 PM