लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : पाल येथे राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. ऑनलाईनमुळे ही स्पर्धा देश-विदेशात पोहोचली. राज्यासह चक्क परदेशातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत हजेरी लावली.
कऱ्हाड तालुक्यातील पाल येथील म्हाळसाकांत विद्यामंदिर येथील चित्रकला शिक्षक विजय शिंगण यांनी पुढाकार घेऊन या स्पर्धेचे आयोजन केले होते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यामुळे मुले मोबाईलमध्येच गुंग झालेली दिसून येतात. या विद्यार्थ्यांनी हातात ब्रश घ्यावा, आपली चित्रकला विकसित करावी, हा उद्देश ठेवून कलाशिक्षक विजय शिंगण यांनी हा उपक्रम राबवला. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘कोरोना योद्धे व जनजागृती’ हा विषय दिला.
समाजमाध्यमाचा वापर करून या स्पर्धेची माहिती शिंगण यांनी अनेक ग्रुपवर पाठवली. ही माहिती फिरत फिरत राज्याच्या, देशाच्या बाहेर परदेशात सिडनीपर्यंत पोहोचली. या स्पर्धेमध्ये चक्क ९९० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात राहणारी स्वरा संदीप लबडे व दुबईमध्ये राहणारी अस्मी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनीही भाग घेतला.
पाल येथील म्हाळसाकांत विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एन. ए. सव्वाशे, कलाशिक्षक विजय शिंगण, तंत्रस्नेही शिक्षक रेवणसिद्ध डुणगे, रवींद्र बागडी, अभिषेक किनीकर यांनी स्पर्धेचे परीक्षण करून निकाल जाहीर केला.
चौकट
मुलांना संस्कारक्षम बनवायचे असेल तर त्यांनी विविध कलांची जोपासना केली पाहिजे. यासाठी कोरोनाच्या काळात शिक्षण बंद असताना विद्यालयाच्या कला विभागामार्फत ऑनलाईन चित्रकला स्पर्धा हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनावर कला संस्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना राज्यासह परदेशातूनही प्रतिसाद मिळाला.
- विजय शिंगण
कलाशिक्षक, म्हाळसाकांत विद्यामंदिर, पाल
फोटो ओळी : ०३ उंब्रज
पाल येथील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील कन्या शाळेची पूनम दादासाहेब सावंत हिने मिळवला. तिने काढलेले चित्र.