चाफळ : ‘चाफळ विभागात मोबाईल टाॅवरचे नेटवर्क सतत संपर्क क्षेत्राबाहेर जात आहे. शिंगणवाडी, पाडळोशी परिसरात याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. पाडळोशी खोऱ्यात मोबाईलला रेंज मिळत नसल्याने गावाच्या बाहेर असलेल्या पासुडी नावाच्या शिवारातील डोंगराच्या टेकडीवर एकत्र जमून शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत आहे.
मोबाईल कंपन्यांनी शहरी भागांसह ग्रामीण भागामध्ये जाळे विणले आहे. मोबाईलमुळे वेळेची बचत होऊन शालेय मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी उपयोग होऊ लागला आहे. व्यक्तिश: लोकांशी संपर्क साधता येत असल्याने मोबाईल काळाची गरज बनली आहे. अनेक मोबाईल कंपन्या शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे वळू लागल्या आहेत. मात्र, सेवा देण्यात या कंपन्या मागे पडू लागल्या आहेत. एकीकडे ग्राहकांना अनेक प्रकारच्या फसव्या योजना दाखवून ग्राहकांना आकर्षित करीत आहेत, तर दुसरीकडे नेटवर्कच गायब होऊ लागल्याने मोबाईल असून, अडचण नसून खोळंबा ठरू लागले आहेत. अनेक वर्षांपासून चाफळ भागात अनेक कंपन्यांनी मोबाईल टॉवर उभे केले आहेत. आयडिया, व्होडाफोन एकत्रीकरणात रेंज गायब होत आहे. रेंज मिळालीच तर आजूबाजूच्या चार-पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांमध्ये येते तेथेही इंटरनेट नेटवर्क व्यवस्थित चालत नाही.
पाडळोशी खोऱ्यात वेगळीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. या परिसरात पाडळोशीसह मसुगडेवाडी, धायटी, तावरेवाडी, नारळवाडी, मुसळेवाडी या सहा गावांमध्ये धायटीनजीक असलेला डोंगर आडवा येत असल्याने रेंज मिळत नाही. या सहा गावांची लोकसंख्या तीन हजारांवर घरात आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणच्या शाळा सुरू नसल्याने शालेय मुलांना ऑनलाईन अभ्यास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावाच्या बाहेर एक किलोमीटर अंतर पार करून डोंगराच्या टेकडीवर जाऊन नेटवर्क शोधावे लागत आहे, तर पालकांनाही याचा त्रास होऊ लागला आहे. नेटवर्कसाठी मुलींना अभ्यास करण्यासाठी घेऊन जाताना पालकांची ससेहोलपट सुरू झाली आहे.