जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. या काळात शहरातील किराणा, दूध, भाजीपाला यांसह अत्यावश्यक वस्तू पालिकेच्या परवानगीने घरपोच दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी केली आहे. संबंधित व्यावसायिकांनी नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना घरपोच साहित्य पोहोच करायचे आहे. विनापरवाना भाजी विकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई होत असून, परवान्यासाठी इच्छुक विक्रेते, व्यापाऱ्यांनी पालिकेत अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी अर्ज केले. मात्र, अर्ज करतानाच पालिकेकडून संबंधितांची कोरोना चाचणी करण्यात आली. गत आठवडाभरात ३६१ विक्रेते, व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी चौदा जण बाधित आढळले आहेत. त्यामुळे पालिकेची यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे.
शहरात घरपोच सेवेसाठी पालिकेने आजअखेर ८० जणांना परवानगी दिली आहे. संबंधितांची कोरोना चाचणी केली असली तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधितांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरपोच सेवा देण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.