सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना अलीकडे कोरोनाच्या चाचण्या येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याचे बोलले जातेय. मात्र, चाचणीला नेमका वेळ का लागतो, या पाठीमागची नेमकी कारणे काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने ऑन दि स्पाॅट रिपोर्टिंग केल्यानंतर अनेक आश्यर्यचकित बाबी समोर आल्या.
लॅबमध्ये टेस्टिंगची क्षमता दिवसाला १२०० असताना केवळ २० कर्मचारी तब्बल अडीच ते तीन हजार कोरोना चाचण्या करीत असल्याचे पाहायला मिळाले. २४ तास हे कर्मचारी आलटून-पालटून ड्यूटी करीत आहेत. एका व्यक्तीचा रिपोर्ट येण्यास चार तासांचा अवधी लागत असल्यामुळे अनेकांचे कोरोना रिपोर्ट येण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो.
जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर १० ऑगस्टला महाराष्ट्रातील एकमेव लॅब साताऱ्यात पहिल्यांदा सुरू झाली. या लॅबमध्ये पहिल्या दिवसापासूनच २० टेक्निशियन आणि डाॅक्टर काम करीत आहेत. आत्तापर्यंत या लॅबमधून १ लाख ४३ हजार २१० नमुने तपासण्यात आले आहेत. या लॅबमध्ये अहोरात्र काम सुरू असते. जितक्या चाचण्या केल्या जात आहेत. तितका ताण कर्मचाऱ्यांवर अधिकच पडत आहे.
जिथून आपल्याला कोरोनाचा उगम समजतोय, तोच विभाग मात्र, दुर्लक्षित राहिलाय. ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ तास अंगात पीपीई किट घालून एक-एक स्राव त्यांना घ्यावा लागतो. घाईगडबड करून चालत नाही. एका स्रावाच्या अहवालाची प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान चार तास तरी लागतात. असे असताना बाधितांच्या चाचणीचा वेग मात्र कमी झाला नाही. कर्मचाऱ्यांची संख्या मात्र तितकीच आहे. या लॅबची क्षमता १२०० टेस्टिंगची असली तरी या २० कर्मचाऱ्यांकडून सध्या दिवसाला २३०० चाचण्या पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे लॅब हेच घर झालेय.
दहा टेक्निशियन घेताहेत प्रशिक्षण.
कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी नुकतेच आणखी १० टेक्निशियन लॅबसाठी दिले आहेत. मात्र, सध्या या टेक्निशियनचे प्रशिक्षण सुरू असून, येत्या चार-पाच दिवसांत हे सर्वजण वीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला येणार आहेत.
हे कर्मचारी कोरोनाला जवळून अनुभवतायत..
एकप्रकारे कोरोनाच्या गोडाऊनमध्ये राहून त्याला शोधून काढणारे कर्मचारी मात्र आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेत. या कर्मचाऱ्यांमुळेच आपल्याला कोरोनाचा रिपोर्ट समजतोय. त्या कर्मचाऱ्यांमध्ये डाॅ. सारिका बडे, डाॅ. तेजस्वी पाटील, डाॅ. सई देसाई, डाॅ. अंकिता देसाई, मायक्रोबायोलाॅजिस्ट प्रीती चिद्रावार, वनिता जमाले, विशाल लोहार, लॅब टेक्निशियन कार्तिक नायडू, वैशाली लादे, करिश्मा लडकत, प्रियांका गजरे, ओमकार सावंत, अमित राठोड, नीता उबाले, हर्षा धेंडे, श्रद्धा परदेशी, राजश्री जाधव, गाैरी राऊत, स्वप्नाली कांबळे, आदींचा समावेश आहे.