सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरू होऊन महिना झाला तरी प्रमुख सहा मोठ्या धरणात सध्या २८ टीएमसीच उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी २० इतकीच आहे. त्यामुळे पावसाने जोर धरल्यासच ही धरणे भरणार आहेत. अन्यथा गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. तर उपयुक्त पाणीसाठा हा १४०.८६ टीएमसी असतो. पश्चिम भागात पाऊस पडत असल्याने ही धरणे भरतात. पण, एखाद्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले तर धरणे भरत नाहीत. गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झाला. यामुळे बहुतांशी धरणे भरली नाहीत.कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, गेल्या वर्षी या धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. तसेच कण्हेर आणि उरमोडी ही धरणेही भरली नव्हती. त्यामुळे पाणी नियोजन करताना अडचणी आल्या होत्या. यंदातरी ही धरणे भरण्याची गरज आहे.
जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन झाले. त्यामुळे मागील जवळपास एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. पण, या पावसात सातत्य नाही. तसेच पश्चिमेकडे अजून म्हणावा असा पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्या कोयना धरणात गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा अधिक आहे. पण, इतर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंता करण्यासारखी आहे. यामुळे पावसाने जोर धरल्यासच ही धरणे भरु शकतात. अन्यथा प्रशासन तसेच शेतकऱ्यांचीही चिंता वाढणार आहे.
कण्हेर, उरमोडी धरणे तळाला..जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कण्हेर, उरमोडी, तारळी धरणाने तळ गाठला आहे. उरमोडी धरण हे ९.९६ टीएमसी क्षमतेचे आहे. पण, धरणात सध्या १.२७ टीएमसीच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर कण्हेर धरण १०.१० टीएमसीचे आहे. सध्या या धरणातही २.१७ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक आहे. तारळी धरणाची क्षमता ५.८५ टीएमसी आहे. या धरणातही १.३८ टीएमसी साठा आहे. ही धरणे भरण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे.
सर्वच धरणक्षेत्रात पाऊस कमी..जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर नाही. त्यामुळे कोयना वगळता इतर धरणात कमी साठा आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला १ हजार २३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धोमला २५८, बलकवडी ५३६ तर कण्हेर २२८, उरमोडी धरणक्षेत्रात ३५८ आणि तारळी येथे ३३१ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे.