सातारा : कुटुंब नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियेत आजही महिला आघाडीवर, तर पुरुष पिछाडीवरच आहेत. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार वर्षभरात तब्बल १४ हजार ४२३ महिला, तर केवळ २९ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. पुरुष प्रधान संस्कृती व नकारात्मक मानसिकतेमुळे ही तफावत असल्याने या आकडेवारीवरून अधोरेखित होते.
शासनाने कुटुंब नियोजनासाठी जनजागृती पर कार्यक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नसबंदी शस्त्रक्रियेबाबत महिला व पुरुषांमध्ये प्रबोधन केले जाते, असे असले तरी नसबंदीबाबतचे गैरसमज व पुरुषी संस्कृतीमुळे जिल्ह्यात नसबंदी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत नगण्य आहे. कुटुंब नियोजनाचा विचार करता घरात महिलांनाच शस्त्रक्रियेसाठी पाठविले जाते. गेल्या दोन वर्षांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात नसबंदीच्या तब्बल ३० हजार २३२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये ३० हजार १७२ महिला, तर केवळ ६० पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे.
नसबंदीतील ही तफावत दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पूर्वीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पुरुषी मानसिकता काही बदलायचे नाव घेत नाही.
अनेक आहेत गैरसमज...
आजही पुरुष प्रधान संस्कृतीचा गाजावाजा असल्याने शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच पुढे केले जाते. पुरुषकर्ता व कमावता आहे, शस्त्रक्रियेनंतर शारीरिक कमजोरी येते असे अनेक गैरसमज समाजात रुढ झाल्याने शस्त्रक्रियेत पुरुषांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. जिल्ह्यात तब्बल २७०० आशा व ४०० अंगणवाडी सेविकांकडून जनजागृती केली जात आहे. मात्र, पुरुषी मानसिकतेत अजूनही बदल झालेला नाही.
(कोट)
मानसिकता नव्हती
नसबंदी शस्त्रक्रियेबाबत पूर्वी मनात अनेक गैरसमज होते. ही शस्त्रक्रिया केल्याने पुरुषत्व नष्ट होते, असेच वाटत होते. मात्र, असे काही होत नाही. मी दोन वर्षांपूर्वी ही शस्त्रक्रिया केली असून, याचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याने साताऱ्यातील नसबंदी केलेल्या व्यक्तीने सांगितले.
(कोट)
महिलांनाच त्रास का
पुरुषांनी आपली मानसिकता बदलायला हवी. मूल जन्माला घालणे, शस्त्रक्रिया करणे याबाबी वाटत्या तितक्या सोप्या नाही. सर्व त्रास महिलांनीच का सहन करायचा. मी बऱ्याच वर्षांपूर्वी नसबंदी केली असून, याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे एका व्यक्तीने सांगितले.
(कोट)
आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश
नसबंदी शस्त्रक्रियेबाबत जिल्हा परिषद व्यापक जनजागृती करीत आहे. शस्त्रक्रियेत महिलांचे प्रमाण सर्वाधिक तर पुरुषांचे अत्यल्प आहे. ही तफावत दूर करण्यासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न केले जातील.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी
(पॉर्इंटर्स)
एक नजर शस्त्रक्रियांवर
वर्ष २०१९ -
एकूण १५८०४
महिलांनी केलेली नसबंदी १५७७३
पुरुषांची केलेली नसबंदी ३१
वर्ष २०२० -
एकूण १४४२६
महिलांनी केलेली नसबंदी १४३९७
पुरुषांची केलेली नसबंदी २९