सातारा : संतोष पोळने तेरा वर्षांत एका मागे एक केलेले खून... कोठेही वाच्छता होत नव्हती... सर्व गुन्हे त्याने सहज पचविले; परंतु त्याच्यासाठी आॅगस्ट महिना दुर्दैवी ठरला. संतोषने सहा खुनांची कबुली दिली अन् एक-एक धक्कादायक माहिती उजेडात येऊ लागली. ११ आॅगस्टपासून आजपर्यंत १६ दिवस २४ तास म्हणजेच सलग ३८४ तास पोलिस ‘मिशन संतोष’वर आहेत. मंगल जेधे खून प्रकरणात ज्योती मांढरे हिला वाई पोलिसांनी ११ आॅगस्ट रोजी अटक केली. प्रथम केवळ मंगल जेधे खून प्रकरणाचाच तपास सुरू असताना एका क्षणी ज्योतीने काही चुका केल्या अन् पोलिसांची चक्रे वेगाने फिरायला लागले. वाई हत्याकांडातील मुख्य सूत्रधार संतोष पोळला अटक केली. ११ आॅगस्टपासून आजपर्यंत सलग ३८४ तास वाई पोलिस याच प्रकरणात अडकले आहेत. संतोष पोळने केलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याने तब्बल सहा खून केले. त्यानंतर सर्व मृतदेह तो राहत असलेले घराचे अंगण, फार्म हाऊसमध्ये पुरले. त्यावर त्याच्या पापाची कृत्ये थांबली नाहीत. आपले काळेकृत्य समाजात बाहेर येऊ नयेत म्हणून संतोषने त्या ठिकाणी झाडेही लावली. हत्याकांडाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक पथक तयार केले आहे. या पथकात सातारा, वाई, शाहूपुरी, भुर्इंज, शिरवळ पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा या तपास कामात होत आहे. ही घटना वाई तालुक्यात घडली असल्याने मुख्य ताण वाई पोलिसांवरच आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या नेतृत्त्वाखाली हे पथक काम करत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे पथक अहोरात्र झटून तपास करत आहेत. पथकाने सोळा दिवसांत एकही सुटी घेतली नाही. तेरा वर्षांत झाली नाही ती कारवाई आपण करतोय, याचा आनंद सर्व कर्मचाऱ्याला वाटतोय. त्यामुळे नवनवीन आणि ठोस पुरावे गोळा करण्यासाठी दिवस-रात्र, वेळ न पाहता हे कर्मचारी नुसते पळत आहेत. वनिता गायकवाड यांचा खून करून मृतदेह नदीपात्रात टाकल्याचे संतोषने सांगितल्यानंतर उंब्रजपर्यंत त्याला नेऊन सारा भाग पिंजून काढला होता. केवळ नियोजन करत न बसता त्याने एखादी माहिती दिल्याबरोबर कसलाही वेळ न घालवता प्रथम त्या ठिकाणी ही मंडळी धाव घेत आहेत. (प्रतिनिधी) हे करताहेत शर्तीचे प्रयत्न... संतोष पोळ प्रकरणात तपास योग्य मार्गाने जावा, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक बी. डी. ओव्हाळ, सहायक पोलिस निरीक्षक पी. डी. सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक पी. एन. खरात, पोलिस हवालदार पी. पी. अहिरेकर, विकास गंगावणे, देशमुख, व्ही. आर. साबळे, नाईक एस. के. भिंगारे, एस. एस. जाधव, हवालदार एन. एच. फरास, कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ यांचे पथक प्रयत्न करत आहे.
सलग ३८४ तास फक्त ‘मिशन संतोष’
By admin | Published: August 29, 2016 12:03 AM