मसूर : किवळ (ता. कऱ्हाड) येथे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला ‘ब्रेक’ लावण्यासाठी युवक व ग्रामस्थांनी लोकसहभागातून देशभक्त भिकोबा आप्पाजी साळुंखे विद्यालय, किवळ येथे ५० बेडचे सर्वसोयींनीयुक्त असे कोविड विलगीकरण केंद्र सुरू करुन कोरोना रुग्णांची व नातेवाईकांची होणारी ससेहोलपट थांबवून आदर्शवत काम केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भयानकता लक्षात घेता, भविष्याची गरज ओळखून दूरदृष्टीने किवळ येथील तरुणाई कोरोना महामारीचे संकट थोपविण्यासाठी एकवटली आहे. गावात वाढणारी रुग्णसंख्या, रुग्णांची व नातेवाईकांची होत असलेली फरपट हा किवळकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनत चालला होता. यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील तरुणाई व ग्रामस्थांनी एकत्रित येत याठिकाणी ५० बेडचे विलगीकरण केंद्र सुरू केले आहे.
या केंद्राला मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश लोखंडे, उंब्रज पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, तहसीलदार अमरदीप वाकडे, मसूर पोलीस दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव आदींनी भेट देऊन तरुणाईच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.
२६किवळ
फोटो कॅप्शन - किवळ (ता. कऱ्हाड) येथील देशभक्त भिकोबा आप्पाजी साळुंखे विद्यालयात ग्रामस्थ व युवकांनी कोविड रुग्णांसाठीचे विलगीकरण केंद्र सुरु केले आहे.