पाटण : पाटण तालुक्यातील नागरिक कड्याकपारीत राहणारे. शासकीय काम किंवा दाखला पाहिजे असेल तर या लोकांनी पाटण अथवा संबंधित सजातील गाव गाठायचे. तिथे गेला तर तलाठी सापडेलच याची खात्री नाही. तालुक्यात २४१ गावे आणि तलाठी फक्त ७५ त्यातच सातबारा आॅनलाईन करण्याच्या कामकाजामुळे तलाठ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. अशा सर्व विचित्र परिस्थितीमुळे तालुक्यातील जनता पुरती हैराण झाली आहे.नुकताच तलाठी संघटनांचा राजव्यापी संप व आंदोलने झाली. त्यात विविध मागण्या होत्या. पाटण तालुक्याच्या दृष्टीने फक्त विचार करायचा झाल्यास दुर्गम व डोंगराळ तालुका, ३० ते ५० किलो मीटरचा प्रवास करायचा मगच पाटणचे तहसील कार्यालय सापडते. ढेबेवाडी, मोरगिरी मरळी, चाफळ, तारळे, कोयना, हेळवाक, मल्हारपेठ, नवारस्ता आदी बाजारपेठांच्या ठिकाणी तलाठी बसण्याची ठिकाणे. सकाळी लवकर उठून धावत पळत यायचे. का तर आण्णासाहेब भेटतील माझे काम होईल; पण कुठलं काय तलाठीच जागेवर नसतात. आणि असलेच तरी एका तलाठ्याला तेरा गावांचा कार्यभार सांभाळायचा आणि सातबारा आॅनलाईनचे गेली अनके महिने चाललेले काम यामुळे लोकांची जमिनी खरेदी-विक्रीची कामे किंवा शासकीय दाखले मिळत नाहीत. एवढेच काय कोर्टकचेरीच्या कामांना देखील सातबारा उतारा तातडीने मिळत नाही. त्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेची स्थिती अत्यंत केविलवाणी इाालेली आहे. (प्रतिनिधी)
२४१ गावांसाठी केवळ ७५ तलाठी
By admin | Published: January 15, 2017 11:24 PM