लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बुधवारी केवळ ३६१ जणांना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे चारशेहून अधिक लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली.
जिल्ह्यात सध्या ४४६ लसीकरण केंद्र आहेत. या लसीकरण केंद्रांना आदल्या दिवशी लसीचा पुरवठा केला जातो मात्र बुधवारी अनेक केंद्रावर लस न पोहोचल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. काही ८ ते १० केंद्रावर केवळ ३६१ जणांना लस देण्यात आली. दरम्यान दुसऱ्या दिवशी गुरुवारीही जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद राहणार असून बुधवारी रात्री पुण्याहून ८८००जिल्ह्यासाठी डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र हे डोस पुरेसे नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वारंवार लसीचा तुटवडा होत असल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसत आहे.
जिल्ह्यात प्रचंड वेगाने कोरोना बाधित यांची संख्या वाढत असताना तितक्याच गतीने लसीकरण ही होणे गरजेचे आहे. परंतु लसीचा तुटवडा जाणवत असल्याने ही कोरोनाची लाट कशी आटोक्यात आणायची, असा प्रश्न आता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.