ढेबेवाडी : मुसळधार पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत करण्यासाठी प्रशासन धडपडत असून, सर्वच विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. तरीही सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचना पायदळी तुडवत अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडवत जनतेच्या जीवाशी खेळ चालवल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रात्री-अपरात्रीच नव्हे तर दिवसाही हे आरोग्य केंद्र कुलूपबंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
सुमारे बारा वर्षांपूर्वी ढेबेवाडी येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूर येथे हलविण्यात आले. मात्र, सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही सणबूर हे गाव सळवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येते. अशी विचित्र गुंतागुंत असलेल्या या आरोग्य केंद्रावर कुणाचाही अंकुश राहिला नसल्याचे स्पष्ट होते.
या प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वमालकीची इमारत नाही. तरीसुद्धा या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मालदन, उमरकांचन, जिंती, मंद्रुळकोळे या चार उपकेंद्रांचा समावेश होतो. तर वाल्मीक पठारावरील जितकरवाडी या गावापासून मालदन मान्याचीवाडीपर्यंतच्या गावांचा समावेश होतो. आतापर्यंत हे आरोग्य केंद्र नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. आतासुध्दा मुसळधार पाऊस आणि कोरोनासारख्या महामारीमुळे येथील जनता मेटाकुटीला आली आहे. त्यातच काही ठिकाणी साथीच्या आजारांचाही फैलाव झाला आहे.
अशावेळी सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सोयीनुसार रुग्णालयाची वेळ निश्चित केली आहे. कधी अकरा वाजता हे रुग्णालय सुरु होते तर कधी दुपारीच कुलूपबंद केले जाते. अनेकदा येथे येणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, उपचाराविनाच परतावे लागते. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पाढा कार्यक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना वाचून दाखवला आहे. तरीसुद्धा रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने विभागातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
.......................................
- या आहेत जनतेच्या तक्रारी
● कोणत्याही गावाला भेट दिली जात नाही, मात्र फिरती रजिस्टरला भेट दिल्याचे दाखविले जाते.
● कर्मचारीही वेळेत हजर नसतात.
● गावोगावच्या स्तनदा माता आणि बालकांचे लसीकरण वेळेत होत नाही.
● वैद्यकीय अधिकारी कधीही येतात, कधीही जातात.
● कोरोना लसीकरणातही केला जातोय मनमानीपणा.
(कोट)
सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतो. आम्ही जनतेच्या अडचणींसाठीच संपर्क करतो. कधी रुग्णालयात गेले तरीसुद्धा ते जागेवर नसतात. रुग्णांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना लसीकरणाचे कोणतेही नियोजन नसल्याने अनेकजण लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले आहेत.
- अमोल पाटील, सरपंच, मंद्रुळकोळे
----------------------------------------------------