सातारा : अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाने ठरविलेल्या निकषांमुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. जोराचा पाऊस अन वादळी वाऱ्यात पिकाचे नुकसान झाले तर सरसकट नुकसान भरपाई मिळणार नाही तर शेतातील एकूण पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती आहे.वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पाऊस वारंवार शेतकऱ्यांची दैना उडवून देत आहे. गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने असाच हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा मार्चच्या तोंडावर अवकाळीने फणा वर काढला आहे. काढणीला आलेला गहू, ज्वारी भुईसपाट झाली आहे. तर शेतात काढून टाकलेली पिकेही मातीमोल झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकऱ्यांनी कोणतीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे नुकसान जास्त झाले. द्राक्ष बागा, आंबा, डाळिंब या पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार केवळ उभ्या पिकालाच नुकसान भरपाई देता येते. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या पिकांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असल्याने कापून ठेवलेल्या पिकाच्या नुकसानीची जबाबदारी शासन घेत नाही. त्यातच शेतातील एकूण पिकापैकी ५0 टक्के नुकसान झाले तरच संबंधित शेतकरी मदतीला पात्र ठरतो. या निकषाची पाचर ठोकली गेली असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक यांच्यापुढे गयावया करावी लागत आहे. हातात पैसा येण्याच्या वेळी हे नुकसान झाले असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. नुकसान भरपाई मिळण्याचीही शाश्वती त्यांना राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोणी वालीच राहिलेला नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही, हेच चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्याजातात. (प्रतिनिधी)नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपातीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानीक यंत्रणांनी राजकीय प्रभावाखाली अथवा कोणाच्याही दबाखाली पंचनामे करू नयेत. प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करूनच पंचनामे करावेत. पंचनाम्यातून नुकसान वास्तववादी मांडावे. या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल- विजय शिवतारे,पालकमंत्री$$्र्रिअधिवेशनात उठविणार आवाजअवकाळीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शेतकरी मेहनतीने पिके घेतात. ही मेहनत कुठल्याही शासकीय निकषामुळे वाया जाऊ नये, अशी आमच्या पक्षाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार आहे.- शशिकांत शिंदे, आमदारअवकाळी नुकसानीच्या प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार केवळ ८५.४0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ४ हजार ९४२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान हे ५0 टक्क्यांपेक्षा कमी आहे. येत्या ५ ते ६ दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून नुकसानीचा सविस्तर अहवाल आम्हाल प्राप्त होईल. शासनाच्या निकषानुसार ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच आर्थिक मदत देता येते.- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अर्धे पीक गेले तरच म्हणे भरपाई
By admin | Published: March 03, 2015 10:01 PM