शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रे महसुली मंडलात येणाऱ्या सात गावांचा भार एक वर्षापासून एकाच तलाठ्यावर आहे. परिणामी या गावातील शेतकरी व ग्रामस्थांची महसुली कामे रखडली आहेत. प्रशासनाने ग्रामस्थांची गैरसोय थांबविण्यासाठी तत्काळ ‘एक सजा, एक तलाठी’ची नेमणूक करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सोनगाव तर्फ सातारा, शेळकेवाडी, आष्टे, कुमठे, भाटमरळी, मापरवाडी, शेरेवाडी या गावांचा भार एकाच तलाठ्यावर आहे. त्यामुळे या सात गावांत महसुली काम करताना तलाठी, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना सात-बारा उतारा, विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, फेरफार नोंदी, दस्त नोंदणी, वारस नोंदणी, संगणकीकृत उतारे मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सात-बारा उतारे घेण्यासाठी लोकांना चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करून, तलाठी ज्या गावात असतील, त्या गावात जाऊन उतारे घ्यावे लागत आहेत.
महसुली कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने लोकांना महसुली कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने परिसरातील लोकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन शेंद्रे मंडलात एक सजा एक तलाठी नियुक्त करून लोकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चौकट
भाटमरळी सजाचे दप्तर दोन ठिकाणी
शेंद्रे मंडलातील भाटमरळी सजाचा अतिरिक्त कार्यभार सोनगाव तर्फ साताराच्या तलाठ्यांना दिला आहे. भाटमरळी सजाचे महसुली दफ्तर दोन ठिकाणी असल्याने काम करताना तलाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. भाटमरळी महसुली सजाला नवीन तलाठी मिळाल्यास भाटमरळी, कुमठे, शेरेवाडी, मापरवाडी या गावांतील ग्रामस्थांची महसुली कामे तात्काळ होण्यास मदत होईल. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन भाटमरळी महसुली सजास कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.
चौकट
पूर्णवेळ तलाठी उपलब्ध होत नसल्याने महसूल विभागाशी संबंधित योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे गावाच्या विकास कामांवर परिणाम होत आहे. प्रशासनाने शेंद्रे मंडलात तलाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी.
- संतोष शेळके,
माजी सरपंच, शेळकेवाडी.
फोटो :
१५शेंद्रे-तलाठी
सातारा तालुक्यातील गावात तलाठीच नसल्याने कार्यालय बंद असते. (छाया : सागर नावडकर)