कराड शहरात नागरी आरोग्य केंद्राद्वारे कोविड-१९ लसीकरणाची प्रक्रिया सोईस्कर व्हावी यासाठी नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीच्या उपलब्धतेनुसार व प्राधान्यक्रमानुसार फोन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.
कराड शहरात लसीकरणाची मोहीम नियोजनरीत्या व प्राधान्यक्रमानुसार देण्याच्या अनुषंगाने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शीतल कुलकर्णी यांनी चर्चा करून निर्णय घेतला आहे.
पालिकेकडे नोंदणी नसल्यास लस दिली जाणार नाही. नोंदणीची वेळ - सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आहे. तसेच नागरी आरोग्य केंद्र, बुधवार पेठ येथे नोंदणी करावयाची असून यासाठी आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड, हृदय, फुफ्फुस, कॅन्सर संबंधित आजार असेल तर डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. लसीकरणाचा प्राध्यान्यक्रम असा आहे. पहिला डोस घेतल्यापासून ५० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेले, पहिला डोस घेतल्यापासून ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेले, वय वर्ष ४५ वरील पहिला डोस घेणारे यांना प्राधान्यक्रमानुसार लसीकरण करण्यात येणार आहे.