सातारा : मराठा समाजाचे विक्रमी मोर्चे काढले जात आहेत. वर्षानुवर्षे मनामध्ये दाटून राहिलेला हुंकार यानिमित्ताने बाहेर पडताना पाहायला मिळतो. अगदी याच पद्धतीने साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी काढल्या जाणाऱ्या महामोर्चात सहभाग होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामोर्चात सहभागी होताना मोबाईल बंद ठेवायचेच; परंतु कोणीही कोणाला नाव, गाव, दूरध्वनी क्रमांक विचारायचा नाही. महामोर्चात केवळ मराठा समाजाची ‘मूक वेदना’ दिसेल, असा दृढनिश्चय करण्यात आला आहे. मराठा क्रांती महामोर्चाच्या अनुषंगाने काही मंडळी खोटा प्रचार करत आहेत. या चुकीच्या प्रचारामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मराठा क्रांती महामोर्चाच्या संयोजकांनी शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत संपूर्ण भूमिका स्पष्ट केली. शिक्षण असूनही हाताला काम नाही, अॅट्रॉसिटीचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्जबाजारी शेतकरी दिवसेंदिवस पिचत चालला असून, आत्महत्त्या करत आहे. महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क भरण्याची आर्थिक कुवत नसणारे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण कायमचे सोडले आहे. या समस्यांवर शासनाने कार्यवाही करावी. संपूर्ण समाजानेही याचा विचार करावा, अशी संयोजकांची भूमिका आहे. शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीच्या सुरुवातीलाच सातारा मराठा महामोर्चात सहभागी झाल्यानंतर कोणी कोणाचं नाव, गाव, मोबाईल नंबर विचारायचा नाही. वर्षानुवर्षे मराठा समाजाच्या मनात जी वेदना आहे, ती मूक पद्धतीने व्यक्त करायची, असे धोरण ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी) बहुजन समाज महामोर्चात आला पाहिजे मराठा क्रांती महामोर्चा हा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. गावा-गावातल्या बहुजन समाजामध्ये याचा विचार पोहोेचणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाभर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावात संपूर्ण समाज एकत्रित करावा, त्यांना मराठा क्रांती महामोर्चाची भूमिका मांडावी. तसेच सर्वच समाजाला या महामोर्चात सामील करून घ्यावे, असेही नियोजन ठरले आहे. वस्तूंची जबाबदारी अनेकांनी घेतली... सातारा मराठा महामोर्चासाठी अनेकांनी सढळ हातांनी मदत केली आहे. कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाहीत, असे मराठा क्रांती समन्वय समितीने ठरविले आहे. महामोर्चासाठी ज्या वस्तूची गरज आहे, ती देण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे. तसेच नियोजनाचा जो आर्थिक भार येईल, तोही उचलायला अनेकजण तयार आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणी काही मागितले तर देऊ नका, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या आहेत प्रमुख व अधिकृत मागण्या ४कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील घटनेतील आरोपीला फाशी द्यावी ४मराठा समाजाला आरक्षण द्यावे ४अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याने या कायद्यात दुरुस्ती करावी ४शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी ४अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करावा ४मराठा समाजातील शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींचे शुल्क शासनाने भरावे अफवांवर विश्वास नको! सोशल मीडियाच्या माध्यमातून सातारा मराठा महामोर्चाच्या अनुषंगाने उलट-सुलट अफवा पसरवल्या जात आहेत. हे साफ चुकीचे असल्याची माहिती संयोजकांनी शुक्रवारी झालेल्या नियोजन बैठकीत दिली. मराठा समाजाने अन्यायाविरोधात कायमच लढा दिला आहे. त्या लढ्याला कोणताही धर्म, जात असे बंधन नव्हते. आगामी मोर्चा मराठा समाज स्वत:वरच झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काढणार आहे. ही बाब संपूर्ण समाजाला पटवून देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. त्यामुळे समाजात पसरवल्या जात असलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.
महामोर्चात असणार केवळ ‘मूक वेदना’!
By admin | Published: September 23, 2016 11:17 PM