सातारा : ''महिलांनी चूल आणि मूल या पलीकडे जाऊन विचार करायला, पाहायला शिकले पाहिजे. आपल्याकडील मुलांमध्ये गुणवत्ता ओतप्रोत भरलेली आहे. त्याला शिक्षकच योग्य तो न्याय देऊ शकतात. म्हणूनच ''सर फाउंडेशन''चे पुरस्कार मोलाचे आहेत,'' असे गौरवोद्गार ऑलिम्पियन धावपटू ललिता बाबर यांनी काढले.
स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च अर्थात सर फाउंडेशन आणि महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम यांच्यावतीने देण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार वितरणाच्या ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्य कर उपायुक्त जाई वाकचौरे, राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, राजकिरण चव्हाण यांच्यासह पुरस्कारार्थी यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
ललिता बाबर म्हणाल्या, ''शिक्षकांमुळे यशस्वी व्यक्तिमत्त्वे घडतात. अनेक क्षेत्रात छाप उमटवू शकतात. शिक्षकांनी मला योग्य मार्गदर्शन केले म्हणून तर मी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकले आणि प्रशासनात कार्य करीत आहे.''
वाघचौरे म्हणाल्या, ''शिक्षकांच्या कार्याला उचित दाद देणे, म्हणजे त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे. शिक्षकांचा सन्मान उज्ज्वल पिढीसाठी आवश्यक आहे.''
माशाळे, वाघ यांनीही यावेळी संवाद साधला .
यावेळी सर फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक लीना पोटे, दुर्गा गोरे, भारती ओंबासे, रुपाली शिंदे, ज्योती कदम, सुवर्णा साळवी, जयश्री क्षीरसागर, सुरेखा कुंभार या शिक्षिकांना ऑनलाइन पद्धतीने नारी शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्य महिला समन्वयक हेमा शिंदे यांनी प्रास्तविक केले. लीना पोटे यांनी स्वागत केले. जिल्हा समन्वयक रवींद्र जंगम यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद आनेमवाड, सतीश सातपुते, राजन गरुड यांनी सहकार्य केले.