कराड,
पुढील पाच वर्षे शेतकरी, सभासद व कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत. याकरिता कृष्णा कारखान्यावर आपल्या विचाराची मंडळी सत्तेत आली पाहिजेत. यशवंतराव मोहितेंनी कारखाना निर्मितीतून शेतकऱ्यांच्या विकासाला एक प्रकारे बळ दिले. त्यांचे विचार पुन्हा राबल्यास नक्कीच सभासदांचा सर्वांगीण विकास होईल. यशवंतराव मोहिते यांचा विचारच कृष्णा कारखान्याला वाचवू शकेल, असे सांगून सभासदांना पारदर्शक कारभार, सन्मानाची वागणूक देऊ, त्याचबरोबर सोनहिरा साखर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्यास रयत पॅनेल कटिबद्ध राहील, अशी ग्वाही राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.
सवादे (ता. कराड) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचारार्थ ते बोलत होते. कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नाना पाटील, ॲड. नरेंद्र नांगरे - पाटील, नितीन थोरात, उदय थोरात, देवदास माने, अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री कदम म्हणाले, ‘‘यशवंतराव मोहितेंनी राज्याच्या सहकाराला दिशा दिली. त्यांचे बोट पकडून अनेक संस्थांनी राज्यातच नव्हे तर देशात लौकिक मिळवला. त्यांच्या विचाराने कृष्णा कारखान्यात पंधरा वर्षे कारभार झाला. यातून सभासदांच्या विकासाला चालना मिळाली; पण गेल्या दहा वर्षात कारखान्यात खूप वाईट प्रथा पडल्या. सभासदांना तोंड बघून ऊसतोड मिळते. त्यांचे शेअर्स ट्रान्स्फर केले जात नाहीत. त्यांच्यावर गुलामगिरीच्या दबावापोटी अन्याय केला जात आहे. सत्ताधाऱ्यांची सभासदांना हीनपणाची वागणूक, दबाव व गुलामगिरी मोडून काढण्यासाठी रयत पॅनेलची सत्ता आली पाहिजे.’’
यावेळी नितीन थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. उदय पाटील यांनी स्वागत केले. प्रदीप थोरात यांनी आभार मानले.
फोटो ओळ
सवादे ता. कराड येथील प्रचार सभेत बोलताना मंत्री विश्वजित कदम.