मलकापूर : जखिणवाडी जसं पुरस्कारप्राप्त आदर्श गावं तसंच नांदलापूरही उपक्रमशील आणि विकसनशील गावं. पण रंगपंचमीदिवशी एका युवकाने दुसऱ्या युवकाला दिलेली एक चापट या दोन्ही गावांना शनिवारी महागात पडली. जखिणवाडीच्या युवकांनी नांदलापूरमध्ये जाऊन दिसेल त्याला मारहाण केली. गज आणि काठ्या नाचवत त्यांनी दहशतही माजवली. रंगपंचमीच्या दिवसापासून जखिणवाडी आणि नांदलापूर ही दोन गावे चर्चेत आहेत. रंगपंचमीदिवशी जखिणवाडीत परंपरागत रंगोत्सव साजरा केला जातो. या दिवशी गावातील मुख्य रस्त्यावर बैलगाड्या धावतात. बैलगाड्यांमधील ग्रामस्थ रस्त्याकडेला थांबलेल्यांवर आणि रस्त्याकडेचे ग्रामस्थ बैलगाडीस्वारांवर रंग उधळतात. गत दीडशे वर्षांपासून गावाला ही परंपरा असल्याचे सांगितले जाते; पण यावर्षी बुधवारी झालेल्या रंगोत्सवात अघटित घडले. युवक आणि पोलिसांमध्ये मारामारी झाली. युवकाने पोलिसांवर गुलाल उधळल्यामुळे संबंधित युवकाला पोलिसांनी मारहाण केली. मात्र, नंतर त्याचे रूपांतर तणावात झाले. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून हुज्जत घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. वादावादीचे हे वादळ शांत होत असताना त्याचदिवशी सायंकाळी जखिणवाडी गावात रंग उडविण्यासाठी पाण्याची पाईप घेतल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. त्या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून काहीजणांना अटक केली. या प्रकारामुळे जखिणवाडी गावात गेल्या चार दिवसांपासून तणावपूर्ण शांतता आहे. बुधवारीच रंगपंचमीदिवशी नांदलापुरातही मारामारीची घटना घडली होती. त्यामध्ये दोघे जखमी झाले होते. ते प्रकरण अद्यापही धुमसत आहे. अशी परिस्थिती असताना बुधवारी नांदलापुरातील एका युवकाने जखिणवाडीतील एका युवकाच्या थोबाडीत लगावली. या घटनेचे चांगलेच पडसाद उमटले. जखिणवाडीतील तीस ते चाळीस युवकांनी नांदलापूर गावात घुसून दिसेल त्याला मारहाण केली. गज व काठ्या नाचवत चांगलीच दहशत माजवली. कोण आणि कशासाठी मारहाण करतायत, याची कसलीच कल्पना ग्रामस्थांना नव्हती. त्यामुळे गावात फक्त गडबड आणि गोंधळच निर्माण झाला. ज्यावेळी खरा प्रकार समोर आला त्यावेळी नांदलापुरातील ग्रामस्थही आक्रमक झाले होते. मात्र, तोपर्यंत पोलीस गावात पोहोचले. पोलिसांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनीही युवकांना शांत राहण्याची सूचना करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत या दोन्ही गावांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. (वार्ताहर)
केवळ एका थोबाडीनं दोन गावं वेठीस !
By admin | Published: March 15, 2015 12:18 AM