करंजे : करंजे तर्फ पिलेश्वरीनगर येथील कॅनॉलजवळील रस्त्यावर लहान मुलांना हाताला येईल, अशा अंतरावरील मुख्य ट्रान्सफॉर्मर खालील फ्यूज बॉक्स उघडाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने दखल घेऊन त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
करंजे तर्फ पिलेश्वरीनगर येथील रस्त्यावरील मुख्य ट्रान्सफॉर्मर खालील फ्यूज बॉक्स उघडा असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. ट्रान्सफॉर्मरच्याशेजारी कॅनॉल असल्याने लहान मुले पोहण्यासाठी येथे येतात, तर काही मुले या रस्त्यावरून रबरी टायर फिरवत असतात. काहीवेळा या विजेच्या खांबाला हे टायर धडकतात व टायर घेण्यासाठी मुले या फ्यूज बॉक्स खालून ये-जा करीत असतात. त्यामुळे कधी अपघात होईल सांगता येत नाही. अनेक लोक हे सकाळी आणि रात्री या रस्त्यावर फेरफटका मारत असतात. जरी चुकून कोणाचा हात लागला तर मोठी जीवितहानी होऊ शकते. डांबरी रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती आहे. कोणत्याही क्षणी एखादे वाहन घसरून सरळ फ्यूज बॉक्सला धडकू शकते. तरी वीज वितरण मंडळाने याची दखल घेऊन त्वरित फ्यूज बॉक्सला झाकण बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.