सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील विकासकामांना मोठा निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, जुन्याच प्रकल्पांच्या घोषणा करून शासनाने जुन्या कढीला ऊत दिला आहे, अशी टीका विरोधक करत आहेत तर जिल्ह्यातील विकासकामांना निश्चितपणे गती मिळेल, असा दावा सत्ताधारी करत आहेत.
अर्थसंकल्पाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, जिल्ह्यासाठी कोणतीही तरतूद या पर्यटस्थळांना पैसे देण्यासाठी प्रस्तावित केलेली नाही. जुन्या मंदिरांसाठी पैसे दिले जाणार आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर येथील मंदिर, औंधची यमाई, वाईचा महागणपती आदी देवस्थानांसाठी निधीची तरतूद झालेली नाही. सातारा जिल्ह्याला शेतकऱ्यांसाठी तरतूद होणे अपेक्षित होते. ते झालेले नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असताना नवीन कोणतीही घोषणा केलेली नाही. केंद्राच्या ज्या योजना आहेत, त्यांना स्वत:च्या नावावर खपवण्याचा उद्योग सुरू आहे. मुंबईच्या धर्तीवर दुष्काळी भागात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करणार होते, त्याचं काय झालं? शासकीय हॉस्पिटलमध्ये स्टाफ नाही. परीक्षा घेतल्या तरी अनेक लोक बेकार आहेत. त्यांना बेकार भत्ता द्यायला हवा होता, तोही दिलेला नाही. जिल्हा परिषद शाळा, शासकीय इमारती पुनर्बांधणीची आवश्यकता होती. ३ हजार कोटींचा आराखडा तयार करण्याचं काम हाती घेणार आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा नाही, असे मत गोरे यांनी व्यक्त केले.
याउलट राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते मंडळी अर्थसंकल्पाबाबत समाधानी आहेत.
कोट
सातारा जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या निधीची तरतूद या अर्थसंकल्पात होणे अपेक्षित होते. मात्र, या शासनाने ते केलेले नाही. उलट ज्या गोष्टी पूर्वीच मंजूर केलेल्या आहेत, त्यांच योजनांची पुन्हा घोषणा करून काय साधणार आहे? रुग्णालयांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, त्यासाठी ज्यांच्या परीक्षा घेतल्या त्यांना नेमणूक दिली जात नाही. शाळा, शासकीय कार्यालयांची पडझड याकडेही दुर्लक्ष केलेले आहे.
- आमदार जयकुमार गोरे
कोट
सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प नाही. जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात, त्यांना कर्जमाफी देणार होते, ते केले नाही. वर्षभरातील वाटचाल पाहिली तर बोलायचं जास्त करायचं काहीच नाही, असे चित्र बघायला मिळाले आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना फायदा होईल, असं वाटत नाही. लोकांना निराश करणारा हा अर्थसंकल्प आहे.
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप