सागर गुजर ।सातारा : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात ऊन, वारा आणि पावसाचा विचार न करता कष्ट करतो, म्हणून सर्वांनाच चार घास सुखाचे मिळतात. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करावे, ही आमची मागणी आहे. साताºयात आज कर्जमुक्ती मेळावा घेतलाय. सातबारा कोरा झाला नाही तर सरकारला सळो की पळो करून सोडू,’ असा इशारा शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिला आहे.
प्रश्न : ऊस दराबाबत स्वाभिमानीची नेमकी भूमिका काय आहे?उत्तर : ऊस दराच्याबाबतीत जयसिंगपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय ऊस परिषदेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका आधीच मांडली आहे. कायद्यानुसार एफआरपी व अधिकचे २०० रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत, अशी आमची मागणी आहे. पहिल्या टप्प्यात एकरकमी एफआरपी आणि नंतर २०० रुपये देण्यावर आम्ही ठाम आहोत.
प्रश्न : योग्य ऊसदर न देणाºया कारखान्यांविरोधात काय करणार?उत्तर : योग्य ऊसदर न देणाºया कारखान्यांनी तशीच भूमिका ठेवल्यास त्यांच्याविरोधात कुठल्याही क्षणी आंदोलन करू, या कारखान्यांवर कारवाई करण्याचा ठराव करून तो साखर आयुक्तांना सादर करणार आहोत.
प्रश्न : सूडाच्या राजकारणामुळे शेतकºयांचा काय तोटा होतोय?उत्तर : भाजपचे सरकार होते तेव्हा कारखानदारांवर दबाव टाकून त्यांना भाजपमध्ये घेण्यात आले. शेतकºयांवर अन्याय होत असल्याचे दिसत असतानाही संबंधित कारखानदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. पदरात पाडून पवित्र करण्याचा जो कार्यक्रम भाजपने राबवला, तोच सध्याच्या सरकारने पुढे चालू ठेवला तर त्यांनाही आम्ही ढिले सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
प्रश्न : शेतकरी हितासाठी कोणता राजकीय बदल अपेक्षित आहे?उत्तर : शेतकºयांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. शेतकºयांची ‘व्होट बँक’ तयार झाल्याशिवाय प्रस्थापितांना धडा मिळणार नाही. सत्ता आणण्याची किमया शेतकरी करून दाखवू शकतात. त्यासाठी शेतकºयांमध्ये जागृती निर्माण होणे हेही तितकेच जरुरीचे आहे.
सख्खा भाऊ जरी नेता असला तरी...उसाला भाव मिळत नसला तरी साखरेला चांगला भाव मिळतो. कारखानदार हेही शेतकऱ्यांचीच पोरं आहेत. कारखानदारीच्या जीवावर विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवतात. मग ते शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका का घेत नाहीत? हा सर्वच शेतकºयांना प्रश्न पडतो. सख्खा भाऊ जरी राजकारणात जाऊन शेतकरीविरोधी भूमिका घेत असेल तरी त्याला खाली खेचण्याची मानसिकता शेतकºयांनी घ्यायला हवी.
काँगे्रसवालेही साधू-संत नाहीतशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही भाजपला मदत केली. त्यांना सत्तेत बसवलं. केंद्राने शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले नाहीत. उलट दुर्लक्षच केलं. त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली व काँगे्रस-राष्ट्रवादीसोबत गेलो. भाजपवाल्यांनाच स्वर्ग दोन बोटेच उरला होता, त्यांचे गर्वहरण करणे जरुरीचे होते. आता राष्ट्रवादी-काँगे्रस सोबत आहे, म्हणजे ते साधू-संत आहेत म्हणून नाही, त्यांनी अपेक्षाभंग केला तर शेतक-यांचा हिसका दाखवू. शेतक-यांची चळवळ महत्त्वाची आहे.