कऱ्हाड : ‘मोहिते यांनी राज्यात सहकार चळवळ व सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यांच्याच कुटुंबात मतभेद झाले. काही मंडळींनी यशवंतराव मोहितेंना विरोध करून संस्था बळकावल्या. या सर्व मंडळींनी त्यांचे विचार बाजूला ठेवले. पूर्वी जे घडले नाही ते गेल्या दहा वर्षांत घडले. सत्ताधाऱ्यांनी कारखाना पोकळ केला आहे. जात व धर्म पाहून ऊसतोड दिली जाते. शेअर्स ट्रान्स्फर होत नाहीत. ८ हजार सभासदांना जाणीवपूर्वक शेअर्स देत नाहीत,’ असे मत राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
मंत्री विश्वजित कदम यांनी नारायणवाडी, धोंडेवाडी, नांदगाव, ओंड, सवादे दौरा केला. यावेळी धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ सभासद तातोबा काकडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या मंगलताई गलांडे, उदय थोरात, नितीन थोरात, उदय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री कदम म्हणाले, ‘भारती विद्यापीठ ही संस्था कागदावर होती. त्या कागदावरील संस्थेचे १९६४ मध्ये यशवंतराव मोहिते यांनी अध्यक्षपद स्वीकारले. एवढा विश्वास ठेवून त्यांनी पतंगराव कदम यांना मार्गदर्शन केल्यामुळे गल्लीबोळातील संस्था दिल्लीत पोहोचली; पण त्याच यशवंतराव मोहितेंचे विचार सोडणाऱ्या लोकांनी अजून कऱ्हाडची वेस ओलांडलेली नाही, हे लक्षात घ्यावे.’
मनोहर शिंदे म्हणाले, ‘इंद्रजित मोहिते सभासदांच्या प्रगतीला न्याय देतील. मतदानाचे ब्रह्मास्त्र आपल्या हातात आहे. परिवर्तनासाठी हे ब्रह्मास्त्र वापरा. गुलामगिरीच्या पद्धतीत चांगल्या लोकांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिले पाहिजे, तरच आपला विकास होईल. यासाठी कृष्णेत परिवर्तन करण्याची गरज आहे.’
दरम्यान धोंडेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या आनंदराव पाटील विद्यालयात वटपौर्णिमेनिमित्त मंत्री कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सचिन काकडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रवीण काकडे यांनी आभार मानले.
फोटो ओळ
धोंडेवाडी, ता. कऱ्हाड येथील प्रचार सभेत बोलताना मंत्री विश्वजित कदम, समवेत उपस्थित सभासद.