कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे .वर्षभर लांबलेल्या या निवडणुकीची कच्ची मतदार यादी बारा एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली. या मतदार यादीतील काही मतदारांवर हरकत घ्यायची असेल तर त्याची मुदत २२ एप्रिल पर्यंत आहे. त्यामुळे कारखान्यातील विरोधक सध्या मतदार यादी चाळण्यात व्यस्त दिसत आहेत.
सातारा व सांगली जिल्ह्यात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीला राजकीय दृष्ट्या खूप महत्त्व आहे. कराड ,वाळवा, कडेगाव, खानापूर या तालुक्यात याचे सभासद विखुरलेले आहेत. त्यामुळे प्रचाराचीही नेत्यांना कसरत करावी लागते. शिवाय दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांचा या निवडणुकीत कसही लागतो .
कारखान्याची सत्ता सध्या सहकार पॅनलच्या डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या गटाच्या ताब्यात आहे. तर कारखान्याचे माजी अध्यक्ष ,भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे रयत पॅनल व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल निवडणुकीच्या मैदानात जोर-बैठका काढत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काय वळण घेणार याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.
खरंतर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत वर्षभरापूर्वीच संपलेली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाला मुदतवाढ मिळत गेली. आजही सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. मात्र कृष्णाचे काही सभासद निवडणूक लवकर घेण्याबाबत न्यायालयात गेले होते. न्यायालयानेही निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्याने कृष्णाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे दिसत आहे .
त्याचाच भाग म्हणून बारा एप्रिल रोजी कृष्णा कारखान्याच्या सभासद मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध झाली आहे. यातील काही नावांवर आक्षेप किंवा हरकत घ्यायची असेल तर त्यासाठी गुरुवार दिनांक २२ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी असणाऱ्या डॉ. इंद्रजीत माेहिते व अविनाश मोहिते यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदार यादी चाळायला प्राधान्य दिले आहे.
भोसले गटाने काही नवे सभासद केले आहेत ते बरोबर आहेत का? मयत म्हणून नोंद असणारे सभासद त्यांच्या नोंदी बरोबर लागल्या आहेत का? अक्रियाशील सभासद ठरवले आहेत ते बरोबर आहेत का? चुकून कोणाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करायचे राहिले आहे का? या साऱ्या बाबी तपासण्याचे काम विरोधक करीत आहेत .त्यासाठी गावोगावच्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले आहे. गावोगावच्या मतदारांची खातरजमा करून घेतली जात आहे. काही आक्षेप घ्यायचे असतील तर त्याबाबतचे पुरावे जमा केले जात आहेत.
गुरुवार दि.२२ पर्यंत हरकती घ्यायची अंतिम मुदत आहे. त्या मुदतीत नक्की कोण कोण हरकत घेणार? किती जणांवर हरकत असणार? त्यावर युक्तिवाद होऊन पुढे काय घडणार? या साऱ्या बाबतची उत्सुकता सभासदांना लागून राहिली आहे. सध्या मतदार यादीत ४६ हजार ३४६ मतदार दिसत आहेत .प्रत्यक्षात निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार होईल त्यामध्ये किती मतदार असणार? हे पाहण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे .
चौकट
एकूण मतदान- ४६ हजार ३४६
चौकट
मतदारांना यातील काही गोष्टींवर हरकत घ्यायची असेल तर ती ऑनलाईन घ्यायची आहे.त्यामुळे सामान्य सभासदाला ते कसे शक्य होणार हा प्रश्न आहे.पण त्याबाबतचा युक्तिवाद पुण्यात चालणार आहे. ते सभासद कसे शक्य करणार हा प्रश्नच आहे.
फोटो : कृष्णा कारखाना संग्रहीत