कऱ्हाड : सध्या विधानसभेचं वारं जोरात वाढू लागलंय, त्यामुळे सामान्य माणसांनाही भाव आलाय सहाजिकच एरव्ही विरोधी बाकावर बसणाऱ्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील मंडळांचा ही भाव वाढलाय; पण कऱ्हाडला या विरोधी पक्षनेत्यांचाही राजकीय त्रांगडं पाहायला मिळत असून, त्याची चर्चाही जोरदार पणे सुरू आहे़ कऱ्हाड पंचायत समितीत धोंडिराम जाधव विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत़ तर वडगावचे जयवंत जगताप जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून अडीच वर्षे कार्यरत आहेत़ विशेष म्हणजे, या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे़ राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी असताना जिल्हा परिषद, पंचायत समितीत, मात्र काँग्रेस सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे़ कऱ्हाड पंचायत समितीत तर काँग्रेस संख्याबळ जास्त असताना त्यांना सत्तेपसून दूर ठेवण्यात आले आहे़कऱ्हाड दक्षिण मधून मुख्यमंत्र्यांचेही नाव चर्चेत आले, त्यामुळे इच्छुक असणारे अतुल भोसलेंनी बंडाचे निशाण हातात घेतले आहे़ त्यामुळे एका झेंड्याखाली एकत्र नांदणाऱ्या कार्यकर्त्यांची गोची झाली़ त्याला हे विरोधीपक्ष नेतेही अपवाद नाहीत; मात्र काँग्रेस पक्षाचेच असूनही वडगावचे नाना मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर तर गोळेश्वरचे धोंडिराम जाधव अतुल भोसलेंच्या गाडीत अन् व्यासपीठावर दिसू लागले आहेत, या दोघांची अवस्था ‘कोणाचा झेंडा घेऊ हाती’ अशीच झाल्याची चर्चा आहे़ (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेत्यांनी निवडले आपापले नेते !
By admin | Published: August 31, 2014 9:33 PM