प्रमोद सुकरेकऱ्हाड : आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून भाजपच्या अनेक नेत्यांच्या आवाजात फेक व्हिडिओ तयार करण्याचे काम सुरू आहे. देशात शांततेत निवडणुका होऊ नयेत यासाठी येत्या महिन्याभरात देशात काहीतरी अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कऱ्हाड येथील सभेमध्ये केला.कऱ्हाड येथे सोमवारी भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी मोदी बोलत होते. ते म्हणाले, या देशांमध्ये काँग्रेसने प्रदीर्घ काळ राज्य केले. परंतु, भारतीय सैनिकांना ''वन रँक वन पेन्शन'' पासून वंचित ठेवले. पण आम्ही तो शब्द दिला होता तो पूर्ण करून दाखविला. ही मोदींची गॅरंटी आहे.सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यामुळे एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा हा जिल्हा कमी नाही. साताऱ्यात भगवा झेंडा फडकत होता, फडकत आहे आणि फडकत राहील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा जाज्वल्य इतिहास आहे. म्हणून तर देशातील अनेक ऐतिहासिक किल्ले हे जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट व्हावेत यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाहीआज आमच्यावरती संविधान बदलणार म्हणून टीका केली जाते. पण, हा मोदी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू देणार नाही व संविधान बदलू देणार नाही, असे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आम्ही काश्मीरमध्ये ३७० कलम हटवून लागू केले. त्यामुळे तेथील लोकांना आता आंबेडकरांना अपेक्षित असणारे आरक्षण लाभणार आहे.
नौदलाच्या ध्वजावर शिवरायांची मुद्राआजही इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल सेनेची चर्चा होते. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळूनही नौदलाच्या झेंड्यावर इंग्रज राजवटीची निशाणी होती. मात्र, आम्ही त्या झेंड्याची ताकद वाढविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मुद्रेला तेथे स्थान दिले आहे. हे आम्ही चांगले केले की वाईट केले? असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. त्यावर उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत त्याला प्रतिसाद दिला.
असे झाले मोदींचे स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आले. त्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रभू रामचंद्रांची चांदीची मूर्ती भेट देऊन स्वागत केले. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाच गडावरील माती भरलेला कलश भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा विसरआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व भारताचे उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कऱ्हाड ही कर्मभूमी. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कऱ्हाडात झालेल्या सभेमध्ये दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा नामोल्लेखही केला नाही. त्याबरोबर उदयनराजे यांनीदेखील आपण मोदी यांच्याकडे यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी मागणी करणार असल्याचे म्हटले होते. पण, त्यांनीही अशी काहीच मागणी केली नाही. याची चर्चा सभा संपल्यानंतर उपस्थितांच्यात सुरू होती.
‘व्हीआयपी’ गाड्यांनी अडवली गर्दीची वाटकृष्णा कॅनॉल चौकातून सभास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटस् टाकून पोलिसांनी रस्ता बंद केला होता. त्यामुळे सभेसाठी हजारोंच्या संख्येने आलेले नागरिक कॅनॉलपासून सभास्थळापर्यंत चालत गेले. मात्र, सभा संपल्यानंतर नागरिक रस्त्यावर आलेले असताना त्याठिकाणी स्थानिक पदाधिकारी, नेत्यांच्या चारचाकी गाड्या रस्त्यातच उभ्या केल्या गेल्या होत्या. त्यामुळे सभास्थळातून बाहेर पडताना नागरिकांना अक्षरश: कसरत करावी लागली. इतर वाहने कॅनॉलपासून पुढे सोडली नसताना या गाड्या आत आल्याच कशा? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत होते.
मंडपाच्या बाहेर बाटल्यांचा खचउन्हाचा तडाखा असल्यामुळे सभेला येणाऱ्या नागरिकांना रस्त्यातच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी नागरिकांना या बाटल्या मंडपात न्यायला मनाई केली. पाण्याच्या भरलेल्या तसेच रिकाम्या बाटल्याही मंडपाबाहेरच नागरिकांना टाकून द्याव्या लागल्या. त्यामुळे मंडपाबाहेर बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येत होते.
सभेची वेळ बदलली; नागरिक ताटकळलेपंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता सभा होणार असल्याचा प्रचार गत काही दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक सकाळी अकरा वाजल्यापासूनच सभास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली होती. दुपारी एक वाजेपर्यंत हजारोंची गर्दी जमली होती. मात्र, प्रत्यक्षात सभा ४ वाजून २० मिनिटांनी सुरू झाली. तोपर्यंत नागरिकांना ताटकळत राहावे लागले. उकाड्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले होते.