दहिवडी : भाजपमध्ये मी जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं, अशा शब्दात माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
जयकुमार गोरे यांना जनाधार राहिला नसल्यामुळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत. म्हणूनच ते भाजप प्रवेशासाठी धडपडत आहेत. जनाधार नसलेल्या गोरेंना भाजपने पक्षात घेऊ नये, असे मत व्यक्त करणाऱ्या भाजपचे माण- खटाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांना माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही जोरदार टीका केली आहे. गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठरावही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.
मी भाजपमध्ये जाणार असं त्यांना कोणी सांगितलं. भाजपमध्ये मी जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं. माझ्याविरोधात ठराव करणारे सर्वजण अदखलपात्र आहेत. माझं नाव घेण्याचा अधिकार तरी त्यांना आहे का ? त्यांनी पहिल्यांदा स्वत:चं अस्तित्व पहावं. गावात त्यांची लायकी आहे का हे ही बघावं, अशा शब्दात माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली.
दहिवडी येथील भाजप पक्ष कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनार्थ भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, उपाध्यक्ष विजयकुमार साखरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब खाडे, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. उज्वल काळे, सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विजय टाकणे, अशोक पवार, संतोष हिरवे, सचिन लोखंडे, वसंत शिर्के, पिंटू जगदाळे, हाणमंत तरटे, बापुराव नलवडे, पोपट काळेल, बालेखान मुलाणी आदी पराभव दिसत असल्याने जयकुमार गोरे भाजपात प्रवेश करण्यासाठी धडपत आहेत,अशी टीका केली होती.