सातारा : विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल महाविकास आघाडीला राहील. तिन्ही पक्षात चर्चा करुन जागा वाटपाचा निर्णय होईल. सातारा जिल्ह्यातही मागीलपेक्षा चांगली स्थिती आघाडीची राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर विशाळगडावरील अतिक्रमाणाला विरोध आहे. पण, पावसाळ्यात हे काम केले. यामध्ये राज्य शासन अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सत्यजितसिंह पाटणकर आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा दाैरा सुरू केला आहे.
पहिला टप्पा २८ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न राहील. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बळ आणि पैशाचा वापर झाला. त्यातच पिपाणी चिन्हाने काही मते खाल्ली. त्यामुळे आमचा उमेदवार काही मताने पराभूत झाला. आताच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आम्ही ज्या जागा लढविणार आहोत. तेथेच चाचपणी करणार आहे. महाविकास आघाडी एकसंध कशी राहील हे पाहण्यात येते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात स्थान आहे. पक्षात घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अजित पवार यांची घरवापसी होणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी घरात कोणाला घ्यायचे हा खासगी प्रश्न आहे. पण, कार्यकर्ता संघर्ष करतो. त्यांची मते महत्वाची आहेत. अजित पवार यांच्या घरवापसीची चर्चा नाही, असे स्पष्ट केले.
तर विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावर त्यांनी तेथे एकत्रित येऊन ठराविक घरात मारहाण आणि लुटमार झाली. हे राज्याला भूषणावह नाही. कारण ही गंभीर घटना आहे. यामध्ये राज्य शासनाला पूर्ण अपयश आलेले आहे. यामधील दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी. तसेच विशाळगडावरील अतिक्रमाणविरोधात आमची भूमिका आहे. पण, हे काम पावसाळ्यापूर्वी किंवा नंतर व्हायला हवे होते. तसेच याबाबत पर्यायी व्यवस्था करुन ते काढायला हवे होते, असेही त्यांनी सांगितले.
पूजा खेडकर प्रकरणात योग्य कारवाई हवी...प्रशिक्षणाऱ्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाबाबतही प्रदेशाध्यक्ष पाटील यांना प्रश्न करण्यात आला. यावर त्यांनी खेडकर यांना चुकीच्या पध्दतीने सर्टीफिकेट देण्यात आली आहेत. वाममार्गाने त्यांनी प्रवेश मिळवला आहे. याबाबत योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले.
लोकसभेला १४-१५ जागा लढविल्या असत्या पण...लोकसभा निवडणुकीत आघाडीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या. आता विधानसभा निवडणुकीत किती मिळणार असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत १४ ते १५ जागा आम्ही लढवू शकलो असतो. तसेच आमचे खासदारही वाढले असते. पण, आघाडी भक्कम रहावी म्हणून दोन पावले मागे आलो. विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांना बरोबर घेऊन जागा वाटप होईल, असे स्पष्ट केले.