सातारा : वैद्यकीय पदवी नसताना केवळ नववी पास असूनही गावोगावी फिरून गर्भलिंग तपासणी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकास मुद्देमालासह ताब्यात घेतले. मात्र, तक्रारदार नसल्याने गुन्हा दाखल न करता सोडण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली. या प्रकरणाची जिल्हाधिकाºयांनी गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत पार्श्वभूमी अशी की, औंध परिसरातून नाथा सहदेव खाडे (वय ३१, रा. धामणी, पो. पिंपरी, ता. माण) हा दुचाकीवर सॅक घेऊन संशयितरीत्या फिरत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोना स्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन, मोटारसायकल (एमएच ११ सीएन ५९०६) आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला होता.
दोन महिने होऊनही तक्रारदार नसल्याने गुन्हा दाखल नाही, पोलीस आणि पीसीपीएनडीटी प्राधिकरणाच्या समन्वयाअभावी संशयित आरोपी अद्याप मोकाट असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी आरोग्य विभागाकडे मुद्देमाल ताब्यात दिला. तसेच त्याबाबत अहवाल मागितला. जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटीने कायदा आणि नियमावर बोट ठेवत मशीन ताब्यात घेण्यास नकार दिला. तरीही पोलिसांनी सोनोग्राफी मशीन खटाव ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्या मशीनबाबत अहवाल मागवला आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानंतर पोलीस भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.गर्भलिंग निदानासाठी गावोगावी भटकंतीतो केवळ नववी पास असून, त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. तरीही मशीनद्वारे गर्भवती महिलांची गर्भलिंग निदान तपासणी करत असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच तो गर्भलिंग निदान करण्यासाठी गावोगावी मोटारसायकलवर मशीन घेऊन फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांनी तक्रारदारच न मिळाल्याने त्याला सोडून दिले होते.