कऱ्हाड : ‘शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ प्रमाणे बिले अदा करण्यासाठी राज्य सरकारकाने पाच वर्षे मुदतीचे बिन व्याजी कर्ज (सॉफ्ट लोन) मंजूर केले असताना काही कारखानदार सभासदांच्या बिलातून पैसे कपात करत आहेत. ही कपात शेतकऱ्यांनी अमान्य केली आहे. दरम्यान कारखानदारांच्या या अन्याया विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेने प्रादेशिक सहसंचालक साखर व सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे कपात केलेले पैसे तातडीने अदा करण्याचे आदेश केले आहेत,’ अशी माहिती बळीराजा संघटनेचे संस्थापक बी.जी.पाटील यांनी दिली आहे. कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकांरांशी ते बोलत होते. यावेळी बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, कऱ्हाड तालुका अध्यक्ष साजिद मुल्ला, पाटण तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तात्यासो पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते. बी. जी. पाटील म्हणाले, ‘राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी पंचाहत्तर टक्यांपर्यंत ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली होती अशा साखर कारखान्यांना ‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी राज्य सरकारने पाच वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. परंतु इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखाना व वाळवा येथील हुतात्मा साखर कारखाना या दोन कारखान्यांनी शासनाच्या या अनुदानातून ठेवी कपात करण्याचा ठराव करून ठेवी घेतल्या होत्या. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना शासनाच्या अनुदानातून या कारखान्यांनी प्रतिटन १४७ ते २०० रुपये वसूल करून शेतकऱ्यांना संकटात टाकले होते. या विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेने प्रादेशिक सहसंचालक साखर व सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती. तसेच सभासद शेतकऱ्यांना आवाहन केले होते की पैसे कापून घेण्याबाबतचे संमत्तीपत्र कारखान्यांना देऊ नये. याला प्रतिसाद देत काही शेतकऱ्यांनी ही कपात अमान्य करत कारखाना व्यवस्थापनाला तसे लेखी कळविले. संघटनेच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन साखर आयुक्त कोल्हापूर यांनी राजारामबापू कारखाना व हुतात्मा कारखाना यांना शेतकऱ्यांचे कपात केलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. कारखान्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कापलेले पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राजारामबापू कारखान्याने सुमारे ७४ लाख रूपये व हुतात्मा कारखान्याने एक कोटीच्या दरम्यान पैसे शेतकऱ्यांना अदा करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
कपातीचे पैसे परत करण्याचे कारखान्यांना आदेश : पाटील
By admin | Published: December 06, 2015 12:01 AM