सातारा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून पोर्टलवर दिनांक देऊन सुरू करावी, असे आदेश शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरून घ्यावा व तशा सूचना प्रसिध्द कराव्यात, असेही सूचित केले आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी गर्दी न करू नये. शाळांनी पालकांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे, त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीची माहिती पोर्टलवरच द्यावी. पालकांनीही मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.
दरम्यान, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
चौकट :
आरटीईअंतर्गत प्रवेश मिळावा, यासाठी बरेच पालक शाळेत आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्त्याचा पुरावा आदी कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी लागते. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आले तर शाळांनी तात्पुरता प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश काढण्यात आले आहेत. प्रवेश न मिळालेल्या पालकांनी पडताळणी समितीकडे अर्ज करून दाद मागण्याचेही सुचित करण्यात आले आहे.
..............