- दिलीप पाडळे (पाचगणी, जि. सातारा)
ध्येय समोर असेल, तर अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात. अशाच प्रकारे व्यवसायाने आरसीसी डिझायनर व जावळी तालुक्यातील बामणेवाडी येथील जी.ए. भिलारे यांनी तब्बल ३५ एकर ओसाड माळरानावर सेंद्रिय शेती केली आहे, तसेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांची ही शेती पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातूनही शेतकरी येत आहेत.
सातारा जिल्ह्यातील बामणेवाडी (वालूथ) येथील कष्टकरी कुटुंबात जी.ए. भिलारे यांचा जन्म झाला. जावळी तालुक्यातील प्रथम सिव्हिल इंजिनिअर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. पुढील एम.ई. स्ट्रक्चरचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ नोकरी केल्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी १९८८ मध्ये छोट्या कंपनीच्या माध्यमातून व्यवसायास प्रारंभ केला. त्यात स्थिरस्थावर झाल्यावर लहानपणापासून जन्मभूमीतील काळ्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे शेतीमध्ये असलेल्या आवडीमुळे काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने त्यांची पावले २००७ मध्ये शेतीकडे वळली. वडिलोपार्जित दीड एकर शेती मुरमाड ओसाड माळरावर होती. त्यासोबत त्यांनी काही शेती विकत घेत, तर काही खंडाने घेतली. शेतीतीतल प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरे केले. शेतीविषयक कृषी प्रदर्शने पाहिली. जिल्ह्यातील शेती अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा शेतावर आयोजित केल्या व त्याचा फायदाही झाला.
नवीन शेती खरेदी करीत एकूण ४० एकर माळरानावर नंदनवन फुलविण्याचे ठरविले. रासायनिक खतांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेतले. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळत पूर्णत: सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यायचे ठरविले. त्यासाठी भौगोलिक परिस्थितीचा खूप फायदा करून घेतला. उंचावर शेततळे असल्यामुळे सायफन पद्धत वापरल्याने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करता आला. शेततळ्याची पाणी साठवण क्षमता १ कोटी लिटर आहे, तर आरसीसी स्टोअरेज टॅन्क २० लाख लिटरचा आहे, तसेच शेततळ्यात मत्स्यव्यवसाय करून उत्पादन घेतले जाते.
सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खतनिर्मितीचा पर्याय आहे. पालापाचोळा, कचरा, शेण याचा वापर करीत उच्च प्रतीचे गांडूळ खत बेड तयार केले. त्यातून तीन महिन्यांतून एकदा असे ७० ते ८० टन गांडूळ खत तयार होते. हे सर्व याच शेतीसाठी वापरले जाते. गूळ, चना डाळीचे पीठ, शेण, गोमूत्र आणि माती याचा वापर करून जिवामृतची निर्मिती केली जाते. जे नेटाफीन सिस्टीमने पिकांच्या मुळापर्यंत जाते. याला जोड म्हणून देशी गायीचेसुद्धा संगोपन केले असून, त्यांच्यासाठी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मका, कडबा, ओला चारा हे खाद्य असते, तसेच येथील बायोगॅसमधून निघालेला मलमा पुन्हा गांडूळखत निर्मितीसाठी वापरतात. या शेतीत ऊस, सोयाबीन, हळद, आले, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, भात, पपई, डाळिंब, स्ट्रॉबेरी, शेवगा, बटाटा, भाजीपाला, आंबा, नारळ इ. पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात.