सचिन काकडे।सातारा : कचरा वेचणारे हात जर शेती पिकवू लागले तर नवलच म्हणावं लागेल. अन् हीच असाध्य गोष्ट सातारा पालिकेच्या कचरा वेचकांनी साध्य करून दाखविली आहे. पालिकेच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज भाजी मंडईच्या पाठीमागे असलेल्या सुमारे दोन गुंठे क्षेत्रात कचरा वेचकांनी वांगी, गवार, मिरची, टोमॅटो आदी पिकांची लागवड केली असून, शेतीसाठी लागणारे कंपोस्ट खतही कर्मचाऱ्यांनी तयार केले आहे.
सातारा पालिकेच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज भाजीमंडईत पालिकेचा कंपोष्ट खतनिर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाठीमागे सुमारे दोन गुंठे जागा ही मोकळी पडून होती. जागेत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. या जागेचा सदुपयोग व्हावा, अशी कल्पना कचरा वेचक श्रमिक संघाचे कर्मचारी शशिकांत भिसे, सचिन पवार, राजू वायदंडे आदींना आली. यानंतर त्यांनी प्रा. विजयकुमार निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार या मोकळ्या जागेत शेती पिकविण्याचा निर्णय घेतला.कर्मचाºयांनी तलावातून काढलेला गाळ आणून या जागेत सर्वत्र पसरला.
यानंतर स्वत:च तयार केलेल्या वांगी, गवार, टोमॅटो, मिरची, काकडी, घोसावळे, दोडका आदी रोपांनी या शेतीत लागवड केली. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता हे कर्मचारी स्वत:च्या हाताने तयार केलेले कंपोष्ट खत या शेतीसाठी वापरू लागले आहेत. सध्या यातील काही पिके जोमात आली असून, एक ते दीड फुटापर्यंत त्यांची वाढही झाली आहे. भाजी मंडईतील सांडपाण्याचाच या शेतीला पुनर्वापर केला जात आहे. कचरा वेचक कर्मचाºयांनी सेंद्रिय शेती पिकवून सर्वांपुढे आदर्श निर्माण केला असून, पालिकेसाठी ही बाब कौतुकास्पद ठरली आहे.पालेभाज्यांचे सर्वप्रथम अधिकाऱ्यांना करणार वाटपसर्वप्रथम आम्ही विविध पालेभाज्यांची रोपे तयार केली. याच रोपांची सेंद्रिय शेतीत लागवड केली. शेतीची निगा राखण्याचे काम आम्ही न चुकता करीत आहोत. या शेतीतून पिकलेल्या पालेभाज्या आम्ही सर्वप्रथम पालिकेच्या अधिकाºयांना देणार आहोत, अशी माहिती कचरा वेचक श्रमिक संघाचे शशिकांत भिसे, सचिन पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘महादरे’तील दोनशे वर्षांचा गाळ शेतीसाठीसाताऱ्यातील ऐतिहासिक महादरे तलावाची उभारणी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी झाली आहे. तेव्हापासून हा तलाव गाळाने भरला होता. दोन महिन्यांपूर्वी पालिकेच्या वतीने हा तलाव गाळमुक्त करण्यात आला. कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी याच गाळाचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी केला आहे.
तब्बल दोन टन खतनिर्मितीछत्रपती प्रतापसिंह भाजी मंडईत गेल्या सात महिन्यांपासून पालिकेचा कंपोस्ट खतनर्मिती प्रकल्प सुरू आहे. मंडईतील टाकावून पालेभाज्या व कचºयापासून येथे खत तयार केले जात आहे. या ठिकाणी खतनिर्मितीचे आठ पीट आहेत. आतापर्यंत याठिकाणी सुमारे दोन टन खताची निर्मिती करण्यात आली आहे.
सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. कचरा वेचकांनी एकत्र येऊन हाती घेतलेला हा उप्रकम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाला पालिकेसह सर्वांनीच पाठबळ द्यायला हवे.- विजयकुमार निंबाळकर