केंद्र सरकारच्या विरोधात २१ जुलैला कराडमध्ये 'मूकमोर्चा'चे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:19 PM2022-07-19T16:19:32+5:302022-07-19T16:19:57+5:30
भाजपमध्ये गेलेल्या किती नेत्यांची पुन्हा चौकशी झाली आहे, हा एक अनुत्तरीत प्रश्न
कऱ्हाड : सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने सूडबुद्धीने कारवाई करीत ईडीची चौकशी सुरु केली आहे. त्याविरोधात कराड तालुका काँग्रेसच्या वतीने कराड शहरामध्ये २१ जुलै रोजी मूकमोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, विद्याताई थोरवडे, शंकरराव खबाले, नरेंद्र पाटील, नानासो पाटील, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, राजेंद्र यादव, शहाजी पाटील, मोहन शिंगाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनोहर शिंदे म्हणाले, सध्याच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद करण्यासाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावून त्या नेत्याची व त्यांच्या कुटुंबाची मानसिकता खराब करण्याचे कारस्थान भाजप सरकारकडून केले जात आहे. परंतु आम्ही काँग्रेस विचारांचे पाईक असे होऊ देणार नाही म्हणूनच २१ जुलै रोजी कराड शहरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून मूकमोर्चा काढला जाईल.
इंद्रजित चव्हाण म्हणाले, इंधनाची भाववाढ असो, नोटबंदी - जीएसटीच्या अंमलबजावणीचा निर्णय असो किंवा शेतकरी विरोधी कायदे असोत हा सर्व मनमानी कारभार जनतेसमोर आणणारे विरोधक यांना चौकशीमध्ये अडकविले जात आहे आणि त्यामध्ये जे शरण येतील, त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला जात आहे, अशी भाजपमध्ये गेलेल्या किती नेत्यांची पुन्हा चौकशी झाली आहे, हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे.