कुडाळ : शासन किशोरी मेळाव्यांसाठी निधी देते. मात्र, जावळीतील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कागदोपत्री हे मेळावे घेतल्याचे दाखवून निधी दामटण्याच्या प्रयत्नात होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे अखेर जावळी एकात्मिक प्रकल्प अधिकारी एन. पी. घोलप यांनी तालुक्यातील नऊ बीटमध्ये या मेळाव्यांचे आयोजन केले आहे, त्यानुसार शनिवारी मेढा बीटमध्ये मेळावा झाला. शासन ११ ते १८ वयोगटांतील मुलींमध्ये आहार, आरोग्यविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने किशोरी मेळाव्यांसाठी निधी देते. त्यानुसार प्रत्येक किशोरीसाठी ५७ रुपयांप्रमाणे किशोरी मेळाव्यांसाठी खर्च करते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शासन आदेशानुसार ६ फेब्रुवारीपूर्वीच हा निधी खर्च करणे बंधनकारक होते. मात्र, जावळीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणत्याही बीटमध्ये एकही किशोरी मेळावा घेतला नव्हता. याबाबत ‘लोकमत’ने २ मार्च रोजी ‘प्रकल्प अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी तालुक्यातील बीटमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी किशोरी मेळाव्यांचे आयोजन करावे, अशा सूचना दिल्या. त्यापैकी मेढा बीटचा मेळावादेखील झाला तर सोमवारपासून इतर बीटमध्ये मेळावे सुरू झाले आहेत. याबाबत नियोजनही झाले आहे. (प्रतिनिधी)
प्रकल्प अधिकाऱ्यांकडून किशोरी मेळाव्यांचे आयोजन
By admin | Published: March 09, 2015 9:42 PM