चाफळ : उत्तरमांड मध्यम प्रकल्पामध्ये बाधित ठरलेल्या माजगाव गावठाणातील माथणेवाडी प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मूळमालकाने अडवल्याने मयत व्यक्तीवर नातेवाईकांना अंत्यसंस्कार करता येईनात. प्रकल्पासाठी जमिनी देऊन त्याग केलेल्या या प्रकल्पग्रस्तांची परवड सुरू आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून स्मशानभूमीची वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.
गमेवाडी येथे उत्तरमांड प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी माथणेवाडी, नाणेगाव बुद्रुक, चाफळ, गमेवाडी येथील अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी देऊन मोठा त्याग केला आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच गमेवाडी येथे उत्तरमांड प्रकल्प उदयास आला आहे. या प्रकल्पामुळे कऱ्हाड व पाटण तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. या प्रकल्पात बाधित ठरलेल्या माथणेवाडी व नाणेगाव बुद्रुक गावातील प्रकल्पग्रस्तांचे शासनाने माजगावनजीक मूळमालकांच्या जमिनी संपादित करून पुनर्वसन केले आहे.
या पुनर्वसन गावठाणात शासनाने अठरा नागरी सुविधा पुरवल्या आहेत. यात प्रामुख्याने स्मशानभूमी व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. सध्या या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट मूळ मालकाने अडवल्याने बिकट बनली आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील मयत व्यक्तिचा मृतदेह घेऊन जाताना मूळ मालकाने रस्ता अडवल्याने तणाव निर्माण झाला होता. ज्या मूळ मालकाने स्मशानभूमीचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याही जमिनीला या प्रकल्पातील पाणी मिळत आहे. तरीही रस्ता अडवून मूळ मालक दुजाभाव करत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून स्मशानभूमीची वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.
कोट :
काही दिवसांपूर्वी येथील प्रकल्पग्रस्त नितीन गायकवाड यांच्या आजी बाळाबाई गायकवाड यांचे निधन झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी बाळाबाई यांचा मृतदेह घेऊन जात असताना मूळ मालकाने या रस्त्यावरून जाण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला. किमान स्मशानात जाण्यासाठी तरी शासनाने रस्ता द्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त नितीन गायकवाड यांनी केली आहे.