आदर्की : आदर्की खुर्द (ता. फलटण) शाळेच्या खोल्यांची दुरुस्ती व सुशोभिकरण करण्यासाठी जुनी झाडे काढून नवीन तीस-पस्तीस शोभेची झाडे गत पंधरवड्यात लावली होती, ती अज्ञात व्यक्तीने तोडून विद्रुपीकरण केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील शाळेच्या खोल्या लोकवर्गणीतून बांधल्या होत्या; परंतु शाळेचा पट वाढल्याने गावाबाहेर सतरा गुंठे जागेत पहिली ते सातवीचे वर्ग भरण्यासाठी वीस वर्षांपूर्वी पाच खोल्या बांधण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने संरक्षक भिंत बांधली, त्यावेळी शाळेच्या आवारातील खोल्यांमधून संगणक व टीव्ही संच गतवर्षी चोरीला गेला होता. त्यानंतर शाळेच्या सुशोभिकरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी शाळेच्या आवारात बदाम, नारळ झाडे तसेच जंगली वृक्ष होते. या झाडांच्या फांद्या छाटून नारळाचे कोवळे नारळ तोडून फेकून दिले होते. गतवर्षी संबंधित झाडे बांधकामाला व पेव्हर्स ब्लॉक, स्टेज बांधण्यासाठी अडचण होत होती म्हणून काढून टाकण्यात आली. पंधरा दिवसांपूर्वी वर्गखोल्यांच्यासमोर प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सालपे येथून रोपवाटिकेतून विविध ३५ शोभेची झाडे आणून ती शोभेचे ओटे बांधून त्यामध्ये माती भरून योग्यरितीने लावली होती. परंतु, अज्ञाताने शाळेच्या आवारात प्रवेश करून पाम जातीची चार झाडे तोडून टाकली आहेत. विद्रुपीकरण केल्याने ग्रामस्थ व पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
गतवर्षी शाळेच्या खोलीतून संगणक व टीव्ही संच अज्ञाताने चोरून नेला होता तर शाळेच्या आवारातील नारळाच्या झाडावरील कोवळे नारळ तोडून फेकून दिले होते. त्यावेळी तोडणाऱ्यांची नावे समजली तसे ग्रामपंचायत प्रशासनाने कल्पना दिली होती. पंधरा दिवसांपूर्वी सालपे येथून शोभेची झाडे आणून लावली होती. ती रात्री अज्ञात व्यक्तींनी तोडून नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे.
- अशोक बोबडे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, आदर्की खुर्द
२४ आदर्की
आदर्की खुर्द (ता. फलटण) शाळेच्या आवारात लावण्यात आलेली पाम जातीची चार झाडे अज्ञातांनी तोडून टाकली आहेत.