लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापन हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहे, कामगारांवर सातत्याने अन्याय केला जात असून, वेतनवाढ व बोनसप्रश्नी नेहमीच्याच सबबी सांगितल्या जात आहेत, याप्रश्नी आम्ही आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचलो असून, करो या मरोची भूमिका राहणार आहे,’ असा इशारा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.सातारारोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमधील कामगारांच्या थकीत वेतनवाढ व बोनसप्रश्नी राष्टÑवादी महाराष्टÑ जनरल कामगार युनियनच्या वतीने सोमवारपासून बेमुदत संप व उपोषण कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरुवात करण्यात आले. यावेळी झालेल्या द्वारसभेत आमदार शिंदे कामगारांना मार्गदर्शन करत होते.युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गोळे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री फाळके, बाळासाहेब फाळके, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊजगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.आमदार शिंदे पुढे म्हणाले, ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजने सातत्याने कामगारांवर अन्याय सुरू ठेवला आहे, माझ्या मतदारसंघातील कारखाना असल्याने मला काही मर्यादा आहेत, अन्यथा व्यवस्थापन व त्यातील अधिकाºयांना शशिकांत शिंदे काय चीज आहेत, हे दाखवून दिले असते. आम्ही कंपनी व्यवस्थापनाशी सातत्याने चांगल्या पद्धतीने वागत आलो आहोत. मात्र, आमच्या चांगुलपणाचा व्यवस्थापन गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे आता खपवून घेतले जाणार नाही. कामगारांच्या मागण्या न्याय हक्काच्या आहेत. त्या मान्य कराव्याच लागतील. अन्यथा व्यवस्थापनाला सातारारोडच काय इतर कोणताही कारखाना सुरू करू देणार नाही,’ असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला.‘वालचंदनगर इंडस्ट्रीजला आमचा अनुभव आहे, त्यांनी आता परीक्षा पाहू नये, कामगारांनी घाम गाळला आहे, त्यांच्या कष्टाचे मोल झालेच पाहिजे. व्यवस्थापनाने कोणतीही सबब न सांगता, वेतनवाढ व बोनसप्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा. केवळ चर्चा नको, आता प्रत्यक्ष कृती हवी आहे, असे स्पष्ट करून आमदार शिंदे यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. व्यवस्थापनाला जाग न आल्यास १७ सप्टेंबर रोजी कामगारांची सहकुटुंबे निदर्शने केली जाणार असून, भजन-कीर्तन कार्यक्रम देखील केला जाणार आहे, असेही शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.विठ्ठल गोळे म्हणाले, ‘राष्टÑवादी युनियनमुळे कामगारांना न्याय मिळाला आहे.. आम्ही वेतनवाढ करारासाठी २१ महिने वाट पाहिली आहे, आता वेळ वाया जाऊ देणार नाही.’कंपनीचे बारा वाजविणार...आमदार शिंदे यांनी बारा वाजता आपल्या भाषणाला सुरुवात केली. तोच कंपनीचा बारा वाजताचा भोंगा वाजला. त्याचा उल्लेख करत त्यांनी आता कंपनीचे बारा वाजविणार असल्याचे सांगितले. भाषण सुरू असतानाच साडेबारा वाजताचा आणि त्यानंतर एक वाजताचा भोंगा वाजताच, त्याचा धागा पकडून सारखा भोंगा वाजतोय, म्हणजे आपल्याला पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. सातारारोडमध्ये दिवसभर या भोंग्याचीच चर्चा होती.कामगारांचा हात वर करून पाठिंबाआमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलनाची व्यापक भूमिका विषद केली. कामगारांनी हात वर करून आंदोनलास पाठिंबा आहे काय? हे दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर उपस्थित कामगारांनी हात वर करून आंदोलनास पाठिंबा दर्शविला. कामगारांनी प्रचंड घोषणाबाजी करत व्यवस्थापनाला आपली ताकद दाखवून दिली.
...अन्यथा कारखाना सुरू करू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:02 PM