सातारा : तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर मी माझ्या जीवाचे बरे वाइट करीन, अशी धमकी देत शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवेज आतार (रा. सदर बझार, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील एका शाळेमध्ये १६ वर्षांची मुलगी शिकत आहे. ती शाळेत जात असताना परवेज तिचा नेहमी पाठलाग करत होता. त्यामुळे त्या मुलीने त्याला तु माझ्या पाठीमागे का येतोस, असे विचारले, यावेळी त्याने तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर मी माझ्या जीवाचे बरे वाइट करीन व मी तुझ्या पाठीमागे असाच येणार, असे म्हणून त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
या प्रकाराची माहिती मुलीने पालकांना दिली. त्यानंतर पालक मुलीला घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात आले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी परवेज आतार याच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोटे हे करीत आहेत.