कोयनानगर : ‘ कोयना प्रकल्प उभारून साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी कोयना प्रकल्पग्रस्तांची अवस्था वेदनादायी असून याचे दुःख होत आहे. डाॅ. भारत पाटणकर व श्रमिक दलाने न्यायासाठी अनेकदा लढे उभारले तरी अजून प्रश्न संपले नाहीत. शासनाने दोन दिवसांत ठोस निर्णय घेतले नाही तर कोयनेची वीज बंद पाडणार,’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.गेल्या तीन दिवसांपासून कोयनानगर येथे सुरू असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. खा. उदयनराजे म्हणाले, ‘ राज्यातील जितकी धरणे आहेत त्यामध्ये धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये धरणाचा जेवढा वाटा, त्याहीपेक्षा प्रकल्पग्रस्तांचा मोठा वाटा आहे.
प्रकल्पग्रस्तांसह पुढच्या पिढ्यांना न्यायासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर त्या पदावर राहण्यास काय अर्थ नाही, माझी बांधिलकी तत्त्वांशी आहे. कोयनेची वीज खंडित झाली की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले जाईल. -उदयनराजे भोसले, खासदार.