मायणी : शासनाने सर्व व्यवहार पुन्हा सुरू केले आहेत. मेंढपाळ समाजाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला शेळ्या-मेंढ्यांचा बाजार पुन्हा सुरू करावा अन्यथा मेंढपाळ आर्मी संघटनेचे राष्ट्रीय संसद प्रमुख अर्जुन थोरात यांच्या नेतृत्वाखाली येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मेंढरे सोडू, असा इशारा मेंढपाळ आर्मी संघटनेचे महासचिव नवनाथ गारळे यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वत्र लाॅकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे संपूर्ण व्यवहार, बाजारपेठा, जिल्हा बंदी, अनावश्यक वाहनबंदी, संचारबंदी, आठवडा बाजार, जनावरांचे बाजार व इतरही निर्बंध लादले होते. आता संपूर्ण व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठा, शासकीय कार्यालय तसेच अन्य व्यवहारांमध्ये ही उलाढाल होण्यास सुरुवात झाली आहे.
सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढपाळ समाज विस्तारला आहे. या मेंढपाळ समाजाचा उदरनिर्वाह लोकर, शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीवर चालतो. मात्र, शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीचे बाजार बंद आहेत. राज्यासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांना मागणी असते. तसेच पावसाळ्यामध्ये मेंढ्यांची लोकर ही चढ्या भावाने विकली जाते. मात्र, शेळ्या-मेंढ्या व लोकर खरेदीचा बाजार बंद असल्याने व मेंढपाळ समाजाला उदरनिर्वाह करण्यासाठी पैशांची गरज असल्याने याच संधीचा फायदा घेत व्यापारी या शेळ्या-मेंढ्यांची खरेदी कवडीमोल भावाने करत आहेत.
मेंढरांच्या लोकरीचाही बाजार बंद असल्याने खरेदी-विक्री होत नाही, त्यामुळे या लोकरीला म्हणावी तशी किंमत येत नाही. मात्र, आर्थिक गरज भागवण्यासाठी मेंढपाळ समाज येईल त्या किमतीला शेळ्या-मेंढ्यांचे व लोकरीचे व्यवहार करत आहे. त्यामुळे मेंढपाळ समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासन जाणूनबुजून मेंढपाळ समाजावर अन्याय करत आहे. त्यामुळे शासनाने वेळकाढूपणा न करता शेळ्या-मेंढ्यांचा खरेदी-विक्रीचा बाजार सुरू करावा अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मेंढरे सोडू, असा इशाराही गारळे यांनी दिला आहे.
२४ मायणी मेंढपाळ
मेंढपाळ समाजाचा असा मोठा शेळ्या-मेंढ्या व लोकर खरेदी-विक्रीचा बाजार भरतो. (संग्रहित छाया)