कऱ्हाड : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही राज्य सरकारने अद्याप सातारा जिल्हा दुष्काळ जाहीर केलेला नाही. तो सरकारने त्वरित जाहीर करावा, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिल ताबडतोब देण्याचे आदेश द्यावेत. या मागण्यांचा शासनाने विचार न केल्यास येत्या २ आॅक्टोंबरला महात्मा गांधी जयंतीदिनी कोल्हापूर नाका येथे ‘एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन’ करू, असा इशारा बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम थोरात, विश्वासराव जाधव, चंद्रकांत यादव, उत्तम साळुंखे उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल, पीककर्ज व्याजासह माफ करावे, वाया गेलेल्या पिकांचा तत्काळ पंचनामा करून एकरी पन्नास हजार रूपये शेतकऱ्यांना द्यावेत, ऊस आंदोलनातील शेतकऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे शासनाने मागे घेण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र, त्याचे अद्यापही शासनाने पालन केलेले नाही, असे पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
...अन्यथा एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन
By admin | Published: September 23, 2015 10:18 PM