कऱ्हाड : गतवर्षी साखर आयुक्तांपुढे झालेल्या बैठकीत ऊसाला ३ हजार १०० रुपये पहिली उचल देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र, जिल्ह्यातील कारखानदारांनी २ हजार ८०० ते ३ हजार १०० रूपयांच्या घरातच शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी गतवर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. अन्यथा कारखानदारांसह नेत्यांच्या सभा उधळून लावणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी दिला. कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे सातारा, सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गोडसे म्हणाले, गतवर्षी गळीत झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये देण्याचे साखर आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत कारखानदारांनी मान्य केले होते. साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनीही तसे आदेश काढले होते. मात्र, दुसरा गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी काही कारखानदारांनी अद्यापही गतवर्षी गाळप झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये दिलेले नाहीत. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २ हजार ८०० ते ३ हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम कारखानदारांनी गाळप हंगामापूर्वीच शेतकºयांना दिली पाहिजे. त्याचबरोबर यंदा गाळप होणाºया उसाला प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल देणे आवश्यक आहे.यंदा वर्षभर साखरेचा दर ४० रूपयाहून अधिक राहिला आहे. कारखानदारांनाही त्यामुळे ४ हजार दर देणे फारसे अवघड नाही. गत काही वर्षात महागाई वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यां चा उत्पादन खर्च वाढला असून शेतकऱ्यांना शेती करणे परवडतच नाही. कारखानदारांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच यंदा गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल जाहीर करावी. मगच कारखाने सुरू करावेत, अशी मागणी शंकरराव गोडसे यांनी केली आहे.कारखानदारांना गावात फिरकू देणार नाही!शेतकरी संघटना यंदा रास्तारोको, ट्रॅक्टरचे नुकसान करणे यासारखी रस्त्यावर उतरून आंदोलने करणार नाही. विधानसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवार कारखान्यांशी निगडीतच आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवार, कारखान्यांचे अध्यक्ष तसेच संचालकांना गावात फिरू देणार नाही. गावागावात निवडणूक कालावधीत होणाऱ्या सभा उधळून लावणार. प्रचाराच्या गाड्यांना माघारी पाठविले जाणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.
..अन्यथा नेत्यांच्या प्रचार सभा उधळून लावणार, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसेंनी दिला इशारा
By संजय पाटील | Published: October 04, 2024 3:47 PM