सातारा : आळजापूर, ता. फलटण येथील परमिट रूम, बारचा परवाना तत्काळ रद्द करावा. अन्यथा उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या सातारा येथील निवासस्थानासमोर आंदोलन करु, असा इशारा व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.व्यसनमुक्त युवक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आळजापूर येथे ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा कोणताही ना हरकत दाखला न घेता ४ जुलैला ग्रामपंचायत क्षेत्रात परमिट रूम, बारचा परवाना सातारा उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला आहे. याविरोधात ग्रामस्थ आणि महिला संतप्त झाले आहेत. तसेच सरपंच शुभम नलवडे यांच्याकडेही बार तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सरपंच नलवडे यांनी ग्रामसभा बोलावून बारचा विषय समोर ठेवल्यावर उपस्थित सर्वच महिला, पुरुषांनी दारू दुकान बंद करावे या बाजूने हात उंचावून पाठिंबा दिला आहे.
उत्पादन शुल्क विभाग परवाना देतेच कसा ? गावाच्या हद्दीत कोणताही व्यवसाय करताना ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मागितला जातो. मात्र, आळजापुरात दारू दुकानाला परवानगी देताना उत्पादन शुल्क विभाग ग्रामपंचायतीची परवानगी नसताना परवाना देतेच कसा ? असाही प्रश्न आहे. ग्रामस्थांना शांतता हवी आहे. यासाठी बारचा परवाना तत्काळ रद्द करावा. अन्यथा व्यसनमुक्त युवक संघ बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन करणार आहे, असा इशाराही विलासबाबा जवळ यांनी दिला आहे.