सातारा: राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार हे वयाने मोठे आहेत. सातारा लोकसभेच्या मागील निवडणुकीतील निकालाबाबत ते जे म्हणाले ते योग्य आहे. मी राजीनामा दिला; पण मागे घेतला नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि परत मागे घेतला. आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना लगावला.
जलमंदिर या निवासस्थानी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी 'भाजपने खा. उदयनराजे यांना मोठी जबाबदारी दिली तरी त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. मागील निवडणुकीत कोणाला फटका बसला हे सर्वश्रुत आहे,' अशी टीका केली होती. याबाबत छेडले असता उदयनराजे म्हणाले, मी राजीनामा दिला; पण मागे घेतला नाही. त्यांनी दिला आणि मागे घेतला तो का घेतला, हे त्यांनाच विचारा. कारण, शेवटी वयाने ते मोठे आहेत. विचारांनी, अनुभवांनीदेखील ते मोठे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीबाबत ते जे काही म्हणाले ते योग्यच आहे; पण मी व आमच्या घराण्याला विश्वासघात करण्याची परंपरा नाही. कोण काय करतो आणि नाही हा भाग वेगळा आहे.
संजय राऊत यांना सामूहिक प्रवक्ते पद द्यावे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाबाबत छेडले असता ते म्हणाले, कर्नाटक व महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत मतदारांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याचा परिणाम हा असू शकतो. खासदार संजय राऊत यांच्या काही वादग्रस्त विधानबाबत विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत हे सर्व पक्षांवर बोलत असतात. आता सर्वच पक्षांनी ठरवून त्यांना सामूहिक प्रवक्ते पद द्यावे, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.