सातारा : घरातील सांडपाणी उघड्यावरून वाहतं, स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झालीय, मैला टाकी कधीच साफ केली जात नाही, कचरा संकलनाची सक्षम व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले, वराहांची संख्या तर अगणित आहे, साथरोगांचा सर्वाधिक फैलाव आमच्या वस्तीतूनच होतो, आमची वस्ती साथरोगांची खाण बनू लागली, ही कैफीयत मांडली सदरबझार येथील झोपडपट्टीवासीयांनी.
साताऱ्यातील झोपडपट्टीने गजबजलेल्या या परिसराला मंगळवारी ‘लोकमत’ टीमनं भेट दिली अन् अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सदरबझार, लक्ष्मीटेकडी परिसरात झोपडपट्टीवासीयांची संख्या हजाराच्या घरात आहे. अनेक वर्षांपासून येथील झोपडपट्टीवासीय रस्ता, पाणी, वीज, आरोग्य अशा मूलभूत सुविधांची मागणी करीत आहेत. मात्र, आजवर वीज, पाणी वगळता इतर सुविधा केवळ कागदोपत्रीच पूर्ण झाल्या आहेत.
दाट लोकवस्ती व झोपडपट्टीचा परिसर असल्याने आम्ही विकासापासून कोसो दूर आहोत. अनेक ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे महिला, पुरुषांना उघड्यावर शौचास बसावे लागते. जेथे स्वच्छतागृह आहेत त्यांची अवस्था असून नसल्यासारखी आहे. मैला टाकी कधीच उपसली जात नाही. येथे बंदिस्त गटारे नाहीत. त्यामुळे सांडपाणी घराशेजारून वाहते. सर्वत्र दलदल व अस्वच्छता पसरली आहे. वराहांची संख्या इतकी आहे की सांगूच शकत नाही. डेंग्यू, मलेरिया व आता कोरोनाचा सर्वाधिक धोका आमच्याच वस्तीला आहे. मात्र, जिवावर उदार होऊन आम्ही जीवन जगत आहोत. आमच्यासाठी ना कोणत्या आरोग्य सुविधा आहेत ना कोणती शिबिरे. आमची वस्ती म्हणजे साथरोगांची खाणच आहे, अशा शब्दांत येथील रहिवाशांनी ‘लोकमत’पुढे आपल्या व्यथा मांडल्या.
नागरिकांना चिखल व घाणीतून मार्ग काढत चालावं लागतं. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे. लोकप्रतिनिधींकडून केवळ विकासाच्या घोषणा केल्या जातात. गेल्या चार वर्षांत साध्या आरोग्य सुविधा प्रशासनाला पुरविता आल्या नाहीत, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं, अशी खंतही येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
(चौकट)
कोरोनासह डेंग्यूची भीती..
सदरबझार, लक्ष्मीटेकडी येथे दि. ३ फेब्रुवारी रोजी हिवताप विभागाकडून सर्व्हे करण्यात आला. यावेळी १९ घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या. सद्य:परिस्थितीत येथील रहिवाशांमध्ये कोरोनाबरोबरच डेंग्यूची धास्तीही अधिक आहे. पालिका प्रशासनाने येथे धूर व औषध फवारणी करण्याबरोबरच नाले व गटारांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
(पॉइंटर्स)
एकूण झोपडपट्ट्या ११२०
लोकसंख्या ४५००
(कोट)
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घाणीतच राहत आलो आहोत. घरातील व शौचालयाचं पाणी असं उघड्यावरून वाहतं. घाणीमुळे झोपडपट्टीत रोगराई सातत्याने पसरते. पालिका प्रशासनाला आमच्या आरोग्याची कसलीच काळजी नाही.
- चंद्रकांत पवार, सदरबझार
(कोट)
पालिकेनं आमच्यासाठी घरकुल बांधून दिलं; पण त्यात ना विजेची सोय केली ना पाण्याची. आम्ही तिथं कसं राहणार. झोपडट्टीवासीयांची अवस्था केविलवाणी झाली आहे. आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाहीत. ही परवड कधी थांबणार समजेना.
- राजू जाधव, सदरबझार
(कोट)
घंटागाडी रस्त्यावर येते व काही क्षणात निघून जाते. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर व इतरत्र कचरा फेकावा लागतो. घाणीमुुळे आमचे व लहान मुलांचे आरोग्य सतत बिघडत आहे. पालिका प्रशासनाने किमान आमच्या आरोग्याची तरी काळजी घ्यावी.
- शालन कांबळे, सदरबझार