सातारा : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेले अजित पवार यांनी शिखर बँकेत २५ हजार कोटी तर सिंचन विभागात ७० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले भ्रष्टाचारी मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचीही हकालपट्टी करावी. अन्यथा आगामी निवडणुकांच्या काळात राज्यातून भाजपला बाहेर करा, असे रान आम्ही उठवू, असा इशारा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
शालिनाताई पाटील म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा मोठा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हातात असतानाही १०० रुपये उसने घ्या म्हणून वेणूताई यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तर अंतुले यांच्या काळात महाराष्ट्रातील कलाकार, चित्रकार यांच्यासाठीचा ५ कोटींचा फंड आपल्याकडे ठेवल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची चौकशी लावली होती. मात्र, २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार करून सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांसारख्या नेत्यांना पाठीशी घालून त्यांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद देतात, हा खूप गंभीर प्रकार आहे. इंदिरा गांधी ५ कोटींसाठी एवढ्या गंभीर होत्या; पण ज्या राजदंडासमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक होतात तोच राजदंड एखाद्या भ्रष्ट माणसाकडे देतात, हा प्रकार अत्यंच चुकीचा असल्याचेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना शालिनीताई पाटील म्हणाल्या, अजित पवारांच्यावर एवढे आरोप आणि एफआयआर दाखल करून सुद्धा त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केलेले नाही. त्यामुळे तत्कालीन पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे. त्याबरोबरच राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांचे सहकारी असलेले छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन अपहारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ यांचाही सहभाग आहे. त्यामुळे या मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून काढून टाकावे. या सर्वांकडे दुर्लक्ष करणारे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे या सर्व प्रकरणावर पांघरूण घालत आहेत. त्यामुळे यांच्याकडेही पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांनीही याबाबत योग्य भूमिका घेतली पाहिजे होती, असेही त्या म्हणाल्या. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी निवडणुका भाजपला जड जातील.विशेष कोर्ट नेमून चौकशी करा
राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजित पवार यांच्यासह भ्रष्टाचारी नेत्यांची चौकशी करण्यासाठी विशेष कोर्ट स्थापन करावे. त्यामार्फत सर्वांची चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत त्यांची हकालपट्टी करून दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणीही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.